पुणे, दि. 23 -भारत माता की जय… एकच वादा विराट दादा… जय भवानी जय शिवाजी.. अशा घोषणांनी फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौक रविवारी दुमदुमन गेला. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताने प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केल्याने आनंदलेल्या तरुणाईने हा जल्लोष साजरा केला.
भारताने पाकिस्तानला पराभवाची धुळ चारल्यानंतर देशभरामध्ये विजयोत्सव साजरा होताना दिसत आहे. भारतीय क्रिकेट संघाने दिवाळीचं मोठं गिफ्ट दिल्याची भावना क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केली. फर्गसन रोडवर भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तरुणाई एकवटली होती. त्यांनी भारताच्या विजयाची घोषणाबाजी करीत परिसर दुमदुमून सोडला. पण आंनद साजरा करताना तरुणाईला वाहतूक कोंडी झाल्याचे भान राहिले नव्हते. बराच वेळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहवयास मिळाले.
खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावे लागले. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर काही वेळाने वाहतूक सुरळीत झाली.