पुणे – सारसबाग खाऊ गल्लीचे पुनर्वसन सणस मैदानाच्या भिंतीच्या बाजूला केले जाणार आहे. तेथे वॉकिंग प्लाझा उभारला जाणार आहे. त्यासाठीचा आराखडा अतिक्रमण नियंत्रण विभागाने तयार केला. त्याला मनपा आयुक्तांचीमान्यता मिळाल्यानंतर बांधकाम विभागाकडे अभिप्रायासाठी पाठविला होता. त्यानंतर ही फाइल गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
बांधकाम विभागात ही फाइल पाठवल्यानंतर ती गहाळ झाल्याचे सांगत याप्रकरणी पोलीस तक्रार देऊन नवीन फाइल तयार करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. दरम्यान, महत्त्वाच्या विभागातून ही फाइल गहाळ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
असा आहे प्रस्ताव
सारसबाग खाऊ गल्लीचे महापालिकेकडून पूर्णत: स्थलांतर करण्यात येणार आहे. येथील खाद्यपदार्थांचे 56 स्टॉल आता सणस मैदानाच्या भिंतींलगत उभारले जाणार आहेत. महापालिकेने त्यासाठीचा सुधारित आराखडा तयार केला आहे. त्यामुळे आता खाऊगल्लीच्या रस्त्यावरूनही पर्यटक तसेच पुणेकरांना सारसबागेचे दर्शन होणार आहे.
सध्या खाऊ गल्लीजवळील प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना स्टॉल असल्याने नागरिकांना सारसबाग दिसत नाही. उत्तरेकडील प्रवेशद्व्राराबाहेर खाद्यपदार्थांच्या 56 स्टॉलला मान्यता देण्यात आली असून, त्यांना व्यवसायासाठी जागा निश्चित करून दिली आहे. मात्र, या स्टॉलचे वाढीव बांधकाम करण्यासह रस्त्यावरच टेबल खुर्च्या लावल्या जातात. अनेकजण रस्त्यावर साहित्य विक्रीसाठी बसतात. त्यामुळे नागरिकांना येथून चालणेही शक्य होत नाही. त्यामुळे वारंवार अतिक्रमाणांवर कारवाई केली जाते.
काही महिन्यांपूर्वी महापालिकेने ही खाऊ गल्लीच सील केली होती. त्या वादावर तोडगा काढण्यासाठी खाऊगल्लीच्या ठिकाणी वॉकिंग प्लाझा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. व्यावसायिकांशी चर्चा करून येथील आराखडा महापालिकेने तयार केला. तसेच, पेशवे उर्जा उद्यानाशेजारी पार्किंगच्या जागेत वाहनतळ विकसित केले जाणार आहे. तेथे किमान 500 वाहने थांबतील एवढी सुविधा विकसित केली जाणार आहे.