पुणे (संजय कडू) – पुणे पोलिसांच्या शिवाजीनगर येथील मुख्यालयात गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) श्वान प्रशिक्षण केंद्र चालविले जात होते. येथे श्वानांसाठी सुसज्ज बराक तसेच त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची सोय होती. मात्र, प्रशिक्षण देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निवासस्थान जुने झाल्याने ते पुणे पोलिसांकडून “लॉकडाऊन’मध्ये पाडण्यात आले. यामुळे सीआयडीच्या श्वान प्रशिक्षकांना त्यांचे श्वान घेऊन इतर राज्यातील केंद्र व तपास यंत्रणांच्या श्वान प्रशिक्षण केंद्रात जावे लागते.
यासंदर्भात माहिती देताना सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्वान प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षकांच्या निवासस्थानाच्या बराकी जुन्या झाल्या होत्या. तसेच त्यांची अनेक वर्षे डागडुजी झालेली नव्हती. त्या धोकादायक स्थितीत असल्याने पुणे पोलिसांनी पाडल्या. सध्या, येथे फक्त श्वानांसाठी बराकी आहेत. यामध्ये 20 श्वान राहतात. श्वानांना प्रशिक्षण देताना, त्यांच्या प्रशिक्षकांच्या त्यांच्या सोबत दिवसभर रहावे लागते. तसेच सकाळी आणि संध्याकाळी त्यांच्याकडून सराव करून घ्यावा लागतो, त्यांच्या आहाराची व्यवस्था, स्वच्छता आणि आजारपणही पहावे लागते. यामुळे प्रशिक्षण केंद्रालगतच प्रशिक्षकांचे निवासस्थानही असते. मात्र, सध्या निवासस्थान नसल्याने प्रशिक्षकांना श्वानांना प्रशिक्षण देताना अनेक अडचणी येतात. यामुळे इतर राज्यात ज्या ठिंकाणी प्रशिक्षकांसाठी निवासी प्रशिक्षण केंद्रे आहेत, तेथे सीआयडीने संपर्क साधून आपले काही काही श्वान प्रशिक्षकांसह प्रशिक्षणाला पाठवले आहेत. सध्या, सीआयडीचे 13 श्वान पंजाब, दिल्ली पोलिसांच्या श्वान प्रशिक्षण आणि रेल्वे पोलिसांच्या इतर राज्यातील श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षकांसह पाठवले आहेत. सीआयडीचे श्वान अमली पदार्थ, स्फोटक पदार्थ आणि गुन्हेगारांचा माग काढतात. काही महिन्यांचे असल्यापासूनच त्यांना प्रशिक्षण द्यावे लागते. राज्यातील पोलीस विभागांत सध्या 350 प्रशिक्षित श्वान आहेत.
दौंड येथे श्वान प्रशिक्षण केंद्रासाठी सीआयडीला 13 एकर जागा मंजूर झाली होती. मात्र, नंतर त्यात पुढे काही प्रगती झाली नाही. त्यानंतर हडपसर येथे वडाचीवाडी येथेही एक जागा मंजूर झाली. सध्या, गृहमंत्रालयाने बारामती येथे एक जागा दिली आहे. मात्र, तेथे श्वान प्रशिक्षण केंद्र सुुरू होण्यास किमान पाच वर्षे लागतील.
– अरविंद चावरीया, डीआयजी, सीआयडी