पुणे – वनाज ते रामवाडी मार्गावरील डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्थानकाचे काम प्रगतीपथावर असून, दोन आठवड्यांत या दोन्ही स्थानकांचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापक (ऑपरेशनल) विनोद अग्रवाल यांनी दिली. यावेळी महामेट्रोचे स्ट्रटेजिक प्लॅनिंगचे व्यवस्थापक अनिल कोकाटे आणि गौतम बिरारे उपस्थित होते.
अग्रवाल म्हणाले, गरवारे कॉलेज स्थानक ते रामवाडी स्थानक मार्गावरील कामे वेगाने सुरू असून, 30 एप्रिल अखेर गरवारे कॉलेज स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या मार्गाचे काम पूर्ण करून सी. एम. आर. एस. इन्स्पेक्शन करण्यात येणार आहे. या मार्गावर डेक्कन, छत्रपती संभाजी महारज उद्यान, पुणे महानगरपालिका, सिव्हिल कोर्ट, मंगळवार पेठ, पुणे रेल्वे स्थानक आणि रुबी हॉल क्लिनिक ही महत्त्वाची स्थानके आहेत.
डेक्कन आणि छत्रपती संभाजी महारज उद्यान स्थानकांचे काम अतिशय आव्हानात्मक होते. कारण हे दोन्ही स्थानके नदी पात्रात बांधण्यात येत आहेत. ऑगस्टपर्यंत या ठिकाणी पाणी असल्यामुळे काम सुरू करने शक्य नव्हते. पण, तरीही क्रेनच्या सहाय्याने काही कामे सुरू करण्यात आली होते. पण, खऱ्या अर्थाने नोव्हेंबरमध्ये छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाचे काम सुरू झाले होते. आठच महिन्यात हे काम 70 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम 30 एप्रिलपर्यंत होईल. डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज स्थानके लवकरच प्रवाशांसाठी खुली होणार आहेत.
‘पगडी’चे काम 60 टक्के पूर्ण
डेक्कन आणि छत्रपती संभाजी महाराज उद्यान या स्थानकांची रचना छत्रपती मावळ्यांच्या पगडीच्या आकाराप्रमाणे आहे. सुमारे 140 मीटर लांब, 26 मी उंच आणि 28 मीटर रुंद अशा भव्य स्थानकांची रचना करणे आव्हानात्मक काम होते. पगडी बनविण्यासाठी ऍल्युमिनियम आणि गॅल्योनियमचा वापर केला आहे. या प्रकारची प्रतिकृती प्रथमच करण्यात येत आहे