नागरिकांचा तीव्र विरोध : विरोधकही एकवटले
पुणे – शहरातील 6 मीटरच्या सुमारे 323 रस्त्यांची रुंदीकरण प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. त्यासाठी आतापर्यंत हजारपेक्षा अधिक हरकती आल्या आहेत. विशेष म्हणजे, रुंदीकरण प्रस्तावित असलेला बहुतांश भाग भाजप नगरसेवक तसेच आमदारांच्याच मतदारसंघातील असून येथील नागरिकांचा रुंदीकरणास तीव्र आक्षेप आहे. त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला हा निर्णय भाजपवरच उलटण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, भाजपचे बहुमत असलेल्या या भागात या निर्णयावरून त्यांना घेरण्याची रणनिती विरोधीपक्षांकडून सुरू करण्यात आली असून त्याचा फायदा निवडणुकीसाठी घेण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली आहे.
भाजप नगरसेवकांनीही या रुंदीकरणास थेट आक्षेप घेतला आहे. प्रशासनाकडे आलेल्या हरकती आणि सूचनांनुसार, डेक्कन, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, आपटे रस्ता, जंगली महाराज रस्ता तसेच औंध येथील आनंदपार्क परिसरातील नागरिकांनी त्यांच्याकडील 6 मीटर रंदीचे रस्ते 9 मीटर रुंद करण्यास आक्षेप घेतला आहे. बंगल्यांच्या प्लॉटचा आकार मर्यादित असणे, रस्ते रुंद झाल्यास तेथे पार्किंग समस्या वाढणे, अनधिकृत खाऊगल्ल्यांमुळे या परिसरातील शांतता भंग होणे अशा तक्रारींचे प्रमाण अधिक आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, “जुन्या नगररचना योजनेनुसार विकसित भागातील नागरिकांनी रस्ता रुंदीकरणास मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला आहे.’ या परिसरांत भाजपचे बहुतांश वर्चस्व आहे. त्यात घरांचा, बंगल्याचा प्लॉटसाइज कमी असल्याचे दर्शवित आहेत. रस्ता रुंद केल्याने प्लॉटची साइज कमी होणार आणि त्याचा फटका भविष्यात बांधकाम करताना बसणार आहे. त्याशिवाय या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक वापर सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिक चारचाकी वाहने रस्त्यांवर पार्क करत आहेत.
रस्ते रुंद केल्यास डेक्कन, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, आपटे रस्ता हा परिसर पार्किंग लॉट होण्याची भीती आहे. दरम्यान, सहकारनगर भागातील रस्ता रुंदीकरणास भाजप नगरसेवक महेश वाबळे यांनी आक्षेप घेतला असून, तातडीने हे रुंदीकरण रद्द करावे अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली आहे.