जलवाहिनी फुटल्याने नागरिकांची अडचण
पुणे – महापालिकेच्या वारजे जलशुद्धिकरण केंद्रातून कात्रज भागाला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने कात्रज परिसरातील पाणीपुरवठा गुरुवारी विस्कळीत झाला. त्यानंतर जवळपास सहा ते सात तासात पाणीपुरवठा विभागाकडून ही जलवाहिनी दुरुस्त करण्यात आल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, अचानक पाणी बंद झाल्याने कात्रज, कोंढवा तसेच धनकवडी भागांतील नागरिकांची चांगलीच अडचण झाली. तर, याच भागातील पद्मावती पंपिंग स्टेशनअंतर्गत होणारा पाणी पुरवठाही देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद असल्याने दक्षिण पुण्यात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे चित्र होते.
महापालिकेच्या वडगाव जलशुद्धिकरण केंद्रातून सिंहगड रस्ता तसेच कात्रज, कोंढवा, धनकवडी भागाला पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी सकाळच्या सुमारास वडगाव जलशुद्धिकरण केंद्रातून तळजाई पंपिंग स्टेशनला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली.
त्यामुळे प्रशासनाकडून सकाळी तातडीने या पंपिंग स्टेशनचे पाणी बंद करण्यात आले. त्यानंतर जवळपास सहातास या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी सातनंतर टप्प्याटप्प्याने कमी दाबाने पाणीपुरवठा सुरळीत झाल्याचे पालिकेने स्पष्ट केले.