प्रवाशांना सुविधा : पीएमपीच्या प्रयत्नांनाही यश
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळकडून (पीएमपी) सुरू केलेल्या कॅशलेस सुविधेला (युपीआयद्वारे तिकिट विक्री) प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. मागील तीन महिन्यांत यूपीआयद्वारे तिकिटविक्री तिपटीने वाढ झाली असून, सप्टेंबर महिन्यात 0.03 टक्के तिकिट विक्रीचे असलेले प्रमाण डिसेंबर अखेर 1.63 टक्कयांपर्यंत पोहचल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष सचिंद्र प्रतापसिंह यांनी आॅक्टोबर 2023 मध्ये कॅशलेस सुविधा सुरू केली. त्याआधी सप्टेंबरमध्ये प्रायोगिक तत्वावर ही सुविधा सुरू केल्यावर 785 जणांनी यूपीआयद्वारे तिकीटविक्री झाली. तेच आॅक्टोबरमध्ये सर्व बसमध्ये ही सुविधा सुरू झाल्यावर 1 लाख 54 हजार तिकीट विक्री झाली. दुसऱ्याच महिन्यात त्यामध्ये दुपटीने वाढ झाली. तर डिसेंबर अखेरपर्यंत यूपीआयद्वारे तिकिट विक्रीची संख्या 4 लाख 31 हजार 139 पर्यंत पोहचली.
तसेच दैनंदिन पास विक्रीतही यूपीआयद्वारे पास घेणार्यांची संख्या तुलनेने वाढली. आॅक्टोबर महिन्यात 35 हजार 583 पास विक्रीची संख्या डिसेंबर अखेरपर्यंत 1 लाख 6 हजारावर जावून पोहचली. दैनंदिन पास विक्रीचे प्रमाण 0.02 टक्कयांवरून 3.83 टक्क्यांवर पोहचले. अध्यक्षांच्या बदलानंतर नवीन पीएमपी अध्यक्ष संजय कोलते यांनीही या सुविधेला गती दिल्यामुळे यूपीआयद्वारे तिकिट आणि पास विक्रीतून पीएमपीला कोट्यवधी रूपयांचा महसूलही मिळाला आहे.
महिना तिकिट विक्री पास विक्री
सप्टेंबर 785 61
आॅक्टोबर 1 लाख 54 हजार 429 35 हजार 583
नोव्हेंबर 2 लाख 66 हजार 463 59 हजार 587
डिसेंबर 4 लाख 31 हजार 139 1 लाख 6 हजार 340