पुणे – श्री एकवीरा देवी मंदिर (कार्ले ता.मावळ) येथे रोप-वे उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला आहे. तो मंजुरीसाठी शासनाच्या पायाभूत समितीकडे पाठविला आहे. कार्ले येथे चालत जाण्यासाठी सुमारे अर्धा ते पाऊण तास लागतो. मात्र रोप वेमुळे अवघ्या तीन मिनिटांत गडावर पोहचता येणार आहे. रोप-वेद्वारे दर तासाला सुमारे 1 हजार 440 नागरिक गडावर पोहचणार असून, या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.
एकविरा देवी मंदिर हे एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. त्याच्याजवळच कार्ला लेणी हे पर्यटकांचे आकर्षणकेंद्र आहे. एकविरा देवी मंदिरात दरवर्षी 7 ते 8 लाख भाविक पर्यटक येतात. एकविरा देवी मंदिर उंच ठिकाणी असल्याने पायऱ्या चढून गडावर जावे लागते. पर्यटकांच्या सोयीसाठी याठिकाणी रोप-वे प्रकल्प उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याठिकाणी रोपवे झाल्यास भाविक, पर्यटकांसाठी सुविधा निर्माण होणार आहे.
एमएसआरडीसीने रोप वे संदर्भात वन विभाग, पुरातत्व विभाग तसेच जिल्हा प्रशासन यांच्या परवानग्या तसेच मार्ग, आणि येणारा खर्च या संदर्भातील अहवाल तयार केला आहे. राज्य शासनाकडून मंजुरी प्राप्त होताच प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
असा असेल प्रकल्प
हा रोप वे प्रकल्प सुमारे 120 मीटर उंचीवर असून लांबी सुमारे 290 मीटर इतकी आहे. रोपवे प्रकल्प हा पूर्णत: पर्यावरणपूरक असणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे अधिक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.