नेवासा, (प्रतिनिधी) – उन्हाच्या तडाख्यात सध्या नेवासा शहर परिसरात लाकडी चरख्याच्या रसवंती गृहाकडे लोकांची अधिक पसंती दिसू लागली आहे. आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने लोकभर उन्हात ताज्या रसाचा आस्वाद घेताना दिसत आहे.
नेवासा शहराच्या दक्षिणेस खुपटी रस्त्यावर संतोष गायकवाड या शेतकऱ्याने ग्राहकांची गरज ओळखून सेंद्रिय उसाची रसवंती सुरू केली आहे. या रसवंतीकडे नेवासा शहरातील लोक आकर्षित होताना दिसत आहे. मॉर्निंग वॉक करताना जथ्थेच्या जथ्थे सकाळीच रसाचा आस्वाद घेताना दिसत आहे.
दुपारच्या सत्रात रखरखत्या उन्हात लोक येथे भेट देऊन रसाचा आस्वाद घेताना चित्र सद्या दिसत आहे. सेंद्रिय उसाच्या रसाबरोबर आद्रक, लिंबू, पुदीना अशी दाह क्षमवणाऱ्या आयुर्वेदिक दृष्ट्या आरोग्यास हितावह असणाऱ्या घटक पदार्थांचा यात समावेश असल्याने लोक सेंद्रिय उसाचा रस घेताना दिसत आहे.
उन्हाळ्यात अनेक रसवंत्या जागोजागी थाटल्या आहेत. यामध्ये मशीनयुक्त रसवंत्या अधिक प्रमाणात आहेत, मात्र जुने ते सोने म्हणून लाकडी चरख्याच्या रसवंत्या सद्या लोकांच्या आकर्षण ठरलेल्या दिसत आहे.
नेवासा तालुक्यात ही नगर- संभाजीनगर महामार्गावर ही लाकडी चरख्याची रसवंतीगृहे दिमाखात थाटलेली दिसत आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस अधिक प्रमाणात वाढत असताना उभारण्यात आलेली रसवंती गृहे ही उन्हाने तप्त व घामाघूम झालेल्या ग्राहकाला तृप्त करण्याचे काम करताना दिसत आहे.