कर्वेनगर, सिंहगड रस्ता भागात पूरस्थिती : पालकमंत्र्यांच्या फोननंतर आयुक्त घटनास्थळी
पुणे – शहरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाने कर्वेनगर, कात्रज, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, सहकारनगर परिसरांत पावसाचे पाणी शिरले. शिवाय, विसर्जन मिरवणुकीमुळे वाहतूक वळवण्यात आलेल्या रस्त्यांवर तळी साचल्याने कोंडी झाली. तर, दुसऱ्या बाजूला या पूरस्थितीचे खापर पालिकेने पावसावर फोडले आहे. पण कोथरूड, कर्वेनगर आणि सिंहगड रस्ता परिसरांत गुरुवारी 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे एक दिवस आधीच आलेला होता. तरीही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
एरवी शहराच्या कोणत्याही भागात पूर आला तरी त्याची साधी दखलही घेतली जात नव्हती. मात्र, कर्वेनगरमध्ये बंगल्यांमधे पाणी शिरल्याने याप्रकरणी थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच महापालिका आयुक्तांना फोन केला. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत असलेले आयुक्तही थेट कर्वेनगरमध्ये पाहणीसाठी गेले. त्यानंतर तातडीने ड्रेनेज तसेच चेंबर साफ करून निचरा करून देण्यात आला.
शहरात सप्टेंबर 2019 मध्ये आंबिल ओढा दुर्घटनेपूर्वी स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक भागांत पाऊस मोजण्याची यंत्रणा तसेच हवामानाचा स्थानिक अंदाज देणारी यंत्रणा कार्यरत केली आहे. त्यावर पुढील तीन दिवसांचे अंदाज कळविले जातात. तर, हवामान विभागानेही शहरात 28 ते 30 सप्टेंबरपर्यंतचा अंदाज कळवला आहे. हवामान विभाग पुढील तीन ते चार तासांचा अंदाजही कळवते.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आलेल्या माहितीनुसार, बावधन-कोथरूड क्षेत्रीय कार्यालय परिसरात 137, वारजे- कर्वेनगर-106, सिंहगड रस्ता 24 मिमी असा अंदाज कळविण्यात आला होता. त्यामुळे एक दिवस आधीच कोथरूड-कर्वेनगर-बावधन भागात मोठा पाऊस होणार असून यंत्रना सज्ज ठेवने अपेक्षित होते. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्याकडे सोयीस्कर दूर्लक्ष केले. प्रत्यक्षात, कर्वेनगर-63 मिमी, सिंहगड रस्ता-58, कोथरूड-53 मिमी, तर धनकवडी-कात्रज भागात जवळपास 40 मिमीपेक्षा अधिक पाऊस दोन तासांत झाला.
दुकाने, घरांमध्ये शिरले पाणी; नागरिक हतबल
कर्वेनगर परिसरात प्रतिज्ञा मंगल कार्यालय परिसर, गंगा नगरी सोसायटी, मोरयाकृपा सोसापटी, मोरेश्वर सोसायटी, स्नेह म्हाडा सोसायटीसह चार ते पाच बंगले आणि दुकानांमध्येही पाणी घुसले. ही बाब स्थानिक नागरिकांनी संदीप खर्डेकर यांना ही माहिती कळविली. त्यानंतर खर्डेकर यांनी थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कळविले. तर, पाटील यांनी तातडीनं आयुक्तांनाच या घटनेची माहिती दिली. त्यावर सायंकाळी सात वाजेनंतर पालिकेची यंत्रणा कामाला लागली. तर रात्री तीनपर्यंत हे पाणी काढण्याचे काम सुरू होते. तर, पाणी काढण्यासाठीचीही यंत्रणा नव्हती.
सिंहगड, बिबवेवाडीत रस्त्यांच्या नद्या
या पावसाने सिंहगड रस्ता तसेच बिबवेवाडी रस्त्यावर नद्या झाल्या होत्या. सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी चौकात रस्त्यावर तीन फूट पाणी साचल्याने 20 ते 25 दुचाकी तसेच काही रिक्षा पाण्यात अडकल्या. तर पाटील हॉस्पिटल समोरही वाहने बंद पडली. वडगाव पुलाच्या खालीही अडीच फूट पाणी साचले होते. बिबवेवाडी भागातही महेश सोसायटी रस्ता, तसेच प्रमुख रस्त्यांवर नद्या वाहत होत्या.