पुणे -आरोग्य क्षेत्रातील संशोधनाबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आता समाज प्रबोधनासाठी इंडियन रेड क्रॉस सोसायटीबरोबर सामंजस्य करार केला आहे. याद्वारे अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.
राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर नुकतत्याच सह्या करण्यात आल्या.
कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, इंडियन रेस क्रॉस सोसायटीच्या पुणे विभागाचे मानद सचिव प्रा. आर.व्ही.कुलकर्णी, ज्युनियर रेड क्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष महाब्री नानावटी आदी उपस्थित होते.
इंडिअन रेड क्रॉस सोसायटी ही अनेक वर्षांपासून आरोग्य विषयक समाजप्रबोधन करत आहे. विद्यापीठावरोबर झालेल्या या करारानुसार सासोयटीच्या तरुणांच्या शाखेबरोबर विद्यापीठ महाविद्यालयांच्या माध्यमातून आरोग्य, सामाजिक प्रश्न, स्वच्छता अशा विविध विषयांवर पथनाट्य, शिबिर, कार्यक्रम या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर काम करणार आहे.
सध्याच्या करोनाच्या काळात समाजाला योग्य दिशा दाखवत त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे या निमित्ताने करणे शक्य होणार आहे.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ