पुणे – शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. किमान तापमानात लक्षणीय घट झाल्यामुळे काही भागातील किमान तापमान ९ अंशापर्यंत खाली असून, शहराच्या उपनगर भागात १० ते ११ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान या आठवड्यात शहरातील थंडीचा कडाका आणखीन वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे शहरासह जिल्ह्यातील किमान व कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली होती. किमान तापमान १८ अंशापर्यंत गेल्यामुळे थंडी गायब झाली होती. मात्र, मागील आठवड्यात किमान तापमानात हळूहळू घट होवू लागली असून, ४८ तासात चार ते पाच अंशाने तापमान घटल्यामुळे अचानक थंडीचा जोर वाढला. बुधवारी (दि. १७) शहरातील किमान तापमान १२ तर एनडीए, पाषाण आणि हवेली भागात किमान तापमान १० अंशापर्यंत खाली आले होते.
दरम्यान, पूर्वेकडून येणारे वारे आणि द्रोणीका स्थिती यामुळे आद्र्ता वाढलेली आहे. त्यामुळे १९ तारखेपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार असून, त्यानंतर किमान तापमानात आणखीन घट होणार असल्याने कडाका वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.