पुणे – पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या 34 गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अजून सुरूच आहे. या शाळांवरील सुमारे 534 शिक्षकांचे हस्तांतरण न करता त्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेकडेच ठेवावी, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेने राज्य शासनाकडे पाठविला आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या पुरेसे नसल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने पत्राद्वारे राज्य शासनाकडे ही मागणी केली आहे.
पुणे जिल्हा परिषदेत सहायक शिक्षक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक यांची एकूण 11,742 मंजूर पदे आहेत. त्यापैकी 10,502 शिक्षक उपलब्ध आहेत. तब्बल 1 हजार 240 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सध्या 3 हजार 563 जिल्हा परिषद शाळांपैकी 80 शाळा या शिक्षकाविना आहेत. परिणामी, आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण दूरावण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये. रिक्त पदे असल्याने शाळांना शिक्षक नाहीत, म्हणून आम्ही राज्य शासनाकडे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांतील शिक्षक जिल्हा परिषदेला मिळावेत, अशी विनंती केली आहे. शिक्षक उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत नक्कीच वाढ होण्यास मदत होईल, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले.