पिंपरी – शहरातील 25 हजार रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्या 73 हजार 207 मालमत्ताधारकांनी त्वरित थकीत कर भरावा. अन्यथा 24 जुलैपासून मालमत्ता जप्ती मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने मालमत्ताधारकांसाठी 30 जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान 10 टक्के व कमाल 20 टक्के सवलत मिळत होती. या सवलत योजनांचा तीन लाखांपेक्षा अधिक मालमत्ताधारकांनी लाभ घेतला. त्यामुळेच पहिल्या तिमाहीत 447 कोटींचा कर पालिका तिजोरीत जमा झाला.
शहरातील 31 मार्च 2023 अखेर 25 हजारांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या 73 हजार 207 मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडे तब्बल सातशे कोटी रुपयांचा कर थकीत आहे. हा कर वसूल करण्यासाठी विभागाच्या वतीने एसएमएस, कॉलिंग, रिक्षाद्वारे जनजागृती, होर्डिंग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. जप्ती पूर्व नोटीसही बजाविल्या होत्या. तसेच, थकबाकीदारांना कस्टमाईज मॅसेज पाठविण्यात आले होते. त्यामुळे 7 हजार 270 मिळकतधारकांनी पार्ट अथवा संपूर्ण पेमेंट असे 60 कोटी 88 लाख रुपयांचा भरणा केला आहे.
नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे
50 हजार रुपयांच्या पुढे थकबाकी असलेल्या 44 हजार 107 मालमत्ता आहेत. यांच्याकडे 652 कोटींचा कर थकीत आहे. या थकबाकीदारांची अधिपत्र तयार असून, याची अंमलबजावणी 24 जुलैपासून होणार आहे. त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी मालमत्ताधारकांनी थकीत कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी
केले आहे.
थकबाकीदारांना नोटीस पाठविणार
24 जुलैपासून एकत्रित जप्ती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कर संकलन विभागाचे कर्मचारी, मीटर निरीक्षक, मंडलाधिकारी, सहायक मंडालाधिकारी, एमएसएफ जवान यांचे पथके सुसज्ज करण्यात आली आहेत. या वेळी मीटर निरीक्षक आणि प्लंबर यांची पथकाला जोड मिळाल्यामुळे जप्ती कारवाई अधिक तीव्र आणि परिणामकारक होणार आहे, असा कयास अधिकाऱ्यांनी बांधला आहे. 25 ते 50 हजारांपुढील 29 हजार 100 मालमत्ता आहेत. यांच्याकडे तब्बल 110 कोटी रुपयांचा कर थकीत आहे. या थकबाकीदारांना 21 जुलैपर्यंत नोटीस बजाविल्या जाणार आहेत. त्यानंतर 24 जुलैपासून जप्ती मोहीम राबविण्यात येणार आहे.