पुणे –करोनाकाळात शहरातील काही खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून बिलापोटी जादा रक्कम घेतल्याच्या तक्रारी आल्या. त्यानुसार संबंधित तक्रारीवरून रुग्णालयाचे प्री-ऑडीट करून जवळपास पाच कोटी रक्कम कमी झाली असून, संबंधित रुग्ण किंवा त्याचे नातेवाइकांना ती रक्कम परत देण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात दिली.
खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी याप्रकरणी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला आरोग्यमंत्री टोपे यांनी उत्तर देताना ही माहिती दिली. त्यावरून खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होते, यावर शिक्कामोर्तब झाला.
करोना संसर्गामध्ये रुग्णांना जीवनदान देण्याचे काम डॉक्टरांनी केले. मात्र, त्याचवेळी शहरातील काही खासगी रुग्णालयांनी या रुग्णांना वाढीव बिल देऊन लुटमारही केली. त्याबाबत आमदार भीमराव तापकीर यांनी बड्या रुग्णालयांची नावे विधिमंडळात मांडत, या नामांकित खासगी रुग्णालयांकडून वाढीव दराने बिले आकारली गेली असून, त्यासंदर्भात महापालिकेकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याची चौकशी केली का? चौकशीत काय आढळून आले? त्यावर काय कारवाई केली गेली असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री टोपे यांनी काही रुग्णालयांकडून जादा बिल आकारल्याचे मान्य करत, या तक्रारी प्राप्त होताच तत्काळ प्री-ऑडिट करून पुढील कार्यवाही करण्यात आल्याचे सांगितले.
जादा आकारलेली रक्कम परत देण्यास टाळाटाळ
पुणे महापालिकेने 14 ऑगस्ट 2020 पासूनची बिले तपासणीचे काम सुरू केले आहे. त्यासाठी मोठ्या रुग्णालयात ऑडिटरची नियुक्ती केली आहे. वाढीव रकमेची बिले कमी करून देणे आणि जादा रक्कम पुन्हा रुग्णांना किंवा नातेवाइकांना देण्याची कार्यवाही सुरू आहे. यामध्ये 1 हजार 479 पैकी 1 हजार 98 बिलांमधून तब्बल 4 कोटी 98 लाख 28 हजार रक्कम कमी झाली. एकूण बिलाची रक्कम 27 कोटी 51 लाख 61 हजार इतकी होती. दरम्यान, काही रुग्णालयांकडून जादा आकारण्यात आलेल्या बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यानुसार सह्याद्री रुग्णालयाला नोटीस बजावल्याचेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्याचे तापकीर यांनी सांगितले.