पुणे – नृत्याचा उपयोग करून अनेक व्याधींवर उपचार केले जातात. यावर आधारित अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संचेती रुग्णालय यांच्या विद्यमाने या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या सायली अगावणे हिचा मॉडर्न विकास मंडळाच्या वतीने डॉ. करमळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सायली कथक नृत्यांगणा (दिव्यांग) असून, ती दिव्यांग मुलांना नृत्य शिकविते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, नृत्य गुरू शमाताई भाटे, मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सायलीचे पालक नंदकिशोर आणि मनिषा अगावणे, बहीण जुईली सातपुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजेश पांडे म्हणाले, जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे. जे आहे ते आनंदाने स्वीकारून भविष्याकडे वाटचाल केली पाहिजे. भाटे म्हणाल्या, नृत्यामुळे एकाग्रता, आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य विकसित होते. व्यक्तिमत्व विकसित होते, व्यायाम होतो, आनंद मिळतो. त्यामुळे मुलांना नृत्यकला शिकविणे आवश्यक आहे. कलेबाबत मुलांमध्ये जागरुकता निर्माण
केली पाहिजे. डॉ. बुटाला यांनी प्रास्ताविक आणि अजित वाराणशीकर यांनी सूत्रसंचालन केले.
पंडित भाटे अभ्यास केंद्र सुरू होणार
नृत्य, नाट्य आणि संगीत याचे गुरुकुल पद्धतीने शिक्षण देण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पं. रोहिणी भाटे अभ्यास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. करमळकर यांनी दिली.