पुणे – महाविद्यालयात विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा आणि शिक्षण मिळते की नाही हे तपासण्यासाठी यूजीसीमार्फत नॅक कमिटीद्वारे महाविद्यालयांची तपासणी केली जाते. आता याच धर्तिवर प्राथमिक शाळांचीही तपासणी केली जाणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत राज्य शाळा मानक प्राधिकरण स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या समितीचे अध्यक्ष पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद असणार आहे. तसेच शांतिलाल मुथा फाऊंडेशन समिती यासाठी लागणारी सॉफ्टवेअर यंत्रणा तयार करत आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार शाळा मानक प्राधिकरण स्थापन करणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र शासनातर्फे स्टार्ट प्रकल्पाअंतर्गत तरतुद मंजूर केली आहे. त्यानुसार नवी प्रणाली विकसीत करण्याची जबाबदारी ही राज्य शैक्षणिक संशोधन आणि शैक्षणिक प्रशिक्षण परिषदेची राहणार आहे. केंद्राच्या नॅक कमिटीच्या धर्तीवर शाळांचीही तपासणी करण्यासाठी शाळा मानक प्राधिकरण काम करणार आहे. याची प्रशासकीय यंत्रणा तयार, शाळांच्या मानांकनासाठी निकष निश्चिती, सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने शांतिलाल मुथा फाऊंडेशनची मदत घेतली असून त्यानुसार कारवाई सुरू आहे.
आम्ही राज्य शासनाच्या सूचनानुसार शाळा मानक प्राधिकरण स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी समिती गठित केली असून, याबाबतचा अहवाल लवकरच राज्य शासनाला सादर करणार आहोत. त्यानंतर ही समिती गठित करून त्यानुसार राज्यातील शाळांची मानांकन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
– आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.पुणे