पुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांची कामे विनाकारण अडवून ठेवली जात असल्याची तक्रार अधिसभा सदस्यांनी मांडली. विद्यार्थ्यांसह अधिसभा सदस्यांना कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या मग्रुर वर्तनावर अधिसभा सदस्यांनी ताशेरे ओढले. या वृत्ताला दुजोरा देत दस्तरखुद्द कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी मलाही अशा कर्मचाऱ्यांचा अनुभव आल्याचे सांगत अधिसभेत मग्रुर कर्मचाऱ्यांबद्दल संताप व्यक्त केला.
अधिसभा सदस्य डॉ. गिरीश भवाळकर यांनी एका विद्यार्थिनीला आलेल्या कटू अनुभव अधिसभेत सांगितला. “पुण्यातीलच एका महाविद्यालयातील विद्यार्थिनीचे परीक्षा विभागात काम होते. तिथे चार तास थांबूनही तिचे काम होत नाही. मी स्वतः संबंधित कर्मचाऱ्याशी बोलतो. त्याला सांगितले की मी अधिसभा सदस्य आहे. तरी तो माझे ऐकत नाही. उलट उद्धट उत्तर देत म्हणतो, आम्हाला अधिसभा सदस्य बिदस्य माहिती नाही.
तुम्ही कुणाशीही बोला या विद्यार्थिनीचे काम होणार नाही. एका अधिसभा सदस्याशी कर्मचारी सौजन्याने वागू शकत नाही, तर सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या व्यथांचा विचारच करता येणार नाही, अशी संतप्त भावना डॉ. भवाळकर यांनी व्यक्त केली. अन्य सदस्यांनीही अशा कर्मचाऱ्यांच्या मग्रुर वर्तनामुळे विद्यापीठाची बदनामी होत असल्याचे निदर्शनास आणून दिली. चौकशी, परीक्षा, प्रवेश आदी विभागांमध्ये विद्यार्थ्यांना अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांची अनेक कामे विनाकारण ताटकळत ठेवली जात असल्याचे अधिसभा सदस्यांनी सांगितले.
“कुलगुरू असो की अधिसभा सदस्य पाच वर्षांनंतर ते जाणार आहेत. मात्र आपण कायम इथेच आहे. अशी भावना काही कर्मचाऱ्यांमध्ये दिसते. त्यामुळे त्यांच्यात मग्रुरी आली असून, मी याचा जाहीर निषेध करतो.
– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू