पुणे –हद्दीलगतची 23 गावे काही महिन्यांपूर्वीच महापालिकेत समाविष्ट झाली. त्यामुळे आगामी निवडणुका एकदम जोरदार होण्याचा अंदाज नागरिकांना तेव्हाच आला होताच. त्याची प्रचिती आता येऊ लागली आहे. समाविष्ट गावांत इच्छुकांची भाऊगर्दी असून, प्रत्येकजण स्वत:ला बलवान दाखवण्यासाठी सर्वांत सोपा असलेला बॅनर्स आणि होर्डिंग्जवर चमकत आहे.
महापालिकेची प्रभाग रचना जवळपास स्पष्ट झाल्याने समाविष्ट गावांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मनात आशेची पालवी फुटली आहे. या गावांत पूर्वी ग्रामपंचायत असताना या मंडळींनी केलेली विकासकामे त्यांचे भांडवल ठरत आहेत. जर, एखाद्याने विकासकामांत सहभाग नोंदवला नसेल, तर मोठ्या नेत्यांसोबतची छायाचित्रे बॅनर्स, होर्डिंग्जवर झळकवली जात आहेत.
या गावांच्या समस्या आणि तेथील विकास कामे हीच या निवडणुकीत कळीचे मुद्दे आहेत. त्यामुळेच जनतेला “मी तुमच्यासाठी कसा योग्य उमेदवार आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न, बॅनर, सोशल मीडिया, सहली, छोटे-मोठे कार्यक्रम, दिनदर्शिका प्रसिद्ध करून केला जात आहे. प्रभागांमध्ये शासकीय विषयांचा सुगावा लागताच त्या गोष्टीसाठी एकाने पाठपुरावा केल्यानंतर त्याची जाहिरातबाजी सोशल मीडिया अकाउंट व बॅनरबाजी करून केली जाते. त्याची माहिती इतर उमेदवारांना मिळताच त्या प्रभागातील इतरही उमेदवार त्या गोष्टींचा पाठपुरावा करून आयुक्त किंवा संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाठपुरावा केल्याची जाहिरात करत आहेत.
देवदर्शन सहली वाढल्या
समाविष्ट गावांतील या नेत्यांनी आता स्थानिक नागरिक त्यातही विशेषत: महिलांसाठी देवदर्शन सहलींचे आयोजन केले आहे. यासाठी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. करोना संसर्गाचे वातावरण निवळले असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी आवर्जून या सहलींसाठी नेले जात आहेत. या सर्व हालचाली निवडणुकीसाठी असल्याने अनेक नागरिक या प्रवासाचा “लाभ’ घेत आहेत.