वारजे (एकता जाधव) –प्रभागरचना स्पष्ट झाली असून, पालिकेच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. आरक्षणाबाबत विद्यमान इच्छुकांमध्ये उत्सुकता आहे. शिल्लक निधी कोठे वापरायचा, यासाठीसुद्धा विद्यमान नगरसेवक शक्कल लढवत आहेत. अनेक उपक्रम आणि छोटी-मोठी उद्घाटने प्रभागात होताना पाहायला मिळत आहेत. पण, हे सर्व एकीकडे सुरू असताना दुसरीकडे श्रेयवादाची लढाईदेखील जोरात आहे.
काम एक, पण श्रेय घेतात अनेक अशी परिस्थिती सध्या वारजे परिसरात आहे. एकाच शासकीय कामाचा अनेकजण पाठपुरावा करून हे काम आपणच कसे पूर्णत्वास नेले आहे, हे जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू आहे. यासाठी पक्षातील आमदार, खासदार व नेते मंडळींना बोलवून एकाच कामाचे दोन-दोन तीन-तीन वेळा उद्घाटने केल्याचा प्रकार समोर येत आहे. याकरता जाहिरातबाजी करून उद्घाटन सोहळे ठेवले जात आहेत. या सर्व प्रकाराने प्रभागातील जनसामान्य मात्र बुचकळ्यात पडले आहेत. नक्की काम कोणी केले? यावरही शंका नागरिक उपस्थित करत आहे.
मूळ समस्या जैसे थे
वारजे परिसर महानगरपालिकेमध्ये जाऊन 27 वर्षे लोटली असूनही, येथील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण, सेवा रस्त्यांचे अर्धवट काम, स्वतःचे नातेसंबंध- हितसंबंध जोपाण्यासाठी सेवा रस्ता किंवा मुख्य रस्त्यांच्या अडवलेल्या जागा, शौचालयांचा अभाव, फक्त काही भागाच्या सुशोभीकरण्यात असलेला रस, परिसराचा भौगोलिक अभ्यास नसणे अशा समस्या समोर येत आहेत. मूळ समस्या जैसे थे असून सद्यपरिस्थितीमध्ये कुठलाही बदल नाही.
- श्रेयवाद सुरू असलेले मुद्दे
- शिवणे-कोंढवे-कोपरे व उत्तमनगर गावांत पाण्याची समस्या
- गोकुळनगर पठार परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी
- कर्वेनगर ते सनसिटी रोडवर मुठा नदीवर पूल
- सामाजिक सत्कार केल्याचे श्रेय
- आकाशनगर भागात वीज, ड्रेनेज व रस्ते कामांसाठी आमदार-खासदारांना पत्रव्यवहार
- गोकुळनगर पठार-वारजे मुख्य रस्त्याचे कॉंक्रीटीकरण
- प्रत्यक्षात नागरिकांची मागणी
- पिण्यायोग्य आणि पुरेसे पाणी.
- आरोग्यविषयक सोयी व सवलती.
- क्रीडांगणे, उद्याने, अग्निशमन केंद्र, विरंगुळा केंद्र, भाजी मंडई, बस थांबा.
- चालता येण्याजोगे पदपथ.
- नवीन समाविष्ट गावांमधील झालेल्या बोगस भरती विषयात स्पष्टता.
- कचऱ्याचे योग्य हस्तांतरण. पर्यायी रस्ते.