पुणे (विजयकुमार कुलकर्णी)- प्रभागात विद्यमान चारही नगरसेवक भाजपचे आहेत. पूर्वीच्या प्रभाग 7 मधील शिवाजीनगर, वाकडेवाडी, संगमवाडी, पाटील इस्टेट, इंदिरा-कस्तुरबा वसाहत हा मोठा भाग वगळला आहे. त्यामुळे चारपैकी दोन नगरसेवक शिवाजीनगर गावठाण-संगमावडी प्रभागात जातील. तर दोन नगरसेवकांचे कार्यक्षेत्र या भागात असणार आहे. अनुकूल असा प्रभाग झाल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा जोर वाढला आहे.
विद्यमान नगरसेवकांना या बदलाला सामोरे जावे लागणार आहे. प्रभागात सोसायट्या, वसाहत आणि झोपडपट्टी भागांचा समावेश आहे. तरीही झोपडपट्टीतील मतदानावरच नगरसेवकांचे भवितव्य अवलंबून आहे. जनता वसाहत, वैदूवाडी, वडारवाडी, रामोशीवाडी, लाल, हिरवी चाळ हा झोपडपट्टीच्या भागाचा यामध्ये समावेश आहे. पंचवटी, पत्रकारनगर, रोहनगरिमा अपार्टमेंट, हनुमाननगर, शिवाजी हौसिंग या सोसायटींचा भाग प्रभागात आहे. तर गोखलेनगर, पीएमसी चाळ, म्हाडाच्या पूरग्रस्त वसाहत या वस्ती भागाचा समावेश आहे. कोथरूड विधानसभा मतदार संघातील पंचवटी हा भाग यामध्ये नव्याने जोडण्यात आला आहे. तेथे 4 ते 5 हजार मतांचा समावेश यामध्ये झाला आहे. तर, पूर्वीच्या प्रभाग क्रमांक 14 शिवाजीनगर येथील वडारवाडी या भागाचा समावेश नवीन प्रभागात झाला आहे. त्यामुळे वडार समाजाची सुमारे 15 ते 20 हजार मते निर्णायक असणार आहेत. यंदा वडार समाजातील इच्छुकांची संख्याही मोठी
प्रभागातील समाविष्ट भाग
पंचवटी, गोखलेनगर, मान सरोवर, वृंदावन, वेताळ टेकडी, मेरीडो कॉलनी, निलज्योती सोसायटी, जनवाडी, वैदुवाडी, पत्रकार नगर, पांडव नगर, समर्थ रामदास उद्यान, शेती महामंडळ, भाम्बुर्डा, वनविहार, रोहनगरिमा अपार्टमेंट, चतृ:श्रृंगी देवी मंदिर परिसर, मॉडर्न कॉलेज, स्क्वेअर यार्ड, स्टेट सी.आय.डी, क्राईम, सेंट जोसेफ हायस्कुल.
आहे. तसेच कोकणी, मुस्लीम आणि मातंग या संघटित समाजाची मतेही महत्त्वपूर्ण ठरतील. उमेदवारी देताना भौगोलिक परिस्थितीचाही विचार पक्षाला करावा लागणार आहे. येथे भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे, वंचित या सर्व पक्षांच्या इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. अनेक अपक्षही इच्छुक आहेत. या सर्वांची ठराविक वोट बॅंक आहे. त्यामुळे उमेदवारी देताना प्रत्येक राजकीय पक्षाची कसरत होणार आहे.
विद्यमान नगरसेवक
गेल्या पंचवार्षिकमध्ये केलेले विशेष काम
“प्रभागात पुण्यातील सर्वात मोठे भांर्बुडा वन-उद्यान तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा करून घेण्यात आले. पुणे विद्यापीठ चौकातील स्वामी विवेकानंद शाळा येथे अत्याधुनिक अशी इ-लायब्ररी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मुळे फक्त प्रभागातील नाही तर सर्व ठिकाणच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मोलाची मदत होणार आहे. तसेच, प्रभागात कचरा संकलनासाठी स्वखर्चाने ई-घंटा गाडी सुरू केली आली. प्रभागत कायदा सुरक्षेसाठी सीसीटीव्ही जाळे उभे करून नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये जोडण्यात आले.’ आदित्य माळवे, (भाजप )
“पीएमसी कॉलनीत क्रीडांगण विकसन काम अंतिम टप्प्यात आले आहे. संगमवाडी येथे स्मशानभूमीचे आधुनिकीकरण. ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिले मोफत फिजिओथेरपी युनिट दळवी हॉस्पिटल येथे सुरू केले. दळवी हॉस्पिटल येथे डायलिसीस सेंटर लवकरच सुरू होणार आहे. महिला सक्षमीकरणातंर्गत महिलांना स्वावलंबी होण्यासाठी 30 ब्युटी पार्लर मोफत कोर्सेस,
अनेक महिलांना शिवण क्लास प्रशिक्षण. महिलांना उज्ज्वल स्किम अंतर्गत गॅस वाटप. कायदा व्यवस्था कायम राहण्यासाठी सीसीटीव्ही बसविले. शेल्टर असोसिएशनच्या माध्यमातून 80 कुटुंबांना मोफत शौचालय बांधून दिले.’ सोनाली लांडगे (भाजप)
गतपंचवार्षिकचे लढवय्ये जनसेवक
प्रभागातील कामांबाबत त्यांचे मत…
“मागील पाच वर्षात प्रभागात नगरसेवक दिसलेच नाहीत. या कालावधीत कामे झाल्याचे दिसून येत नाही. अनेक ठिकाणी ड्रेनेजलाइन चोकप झाल्या आहेत. त्या बदलल्या नाहीत. यासाठी निधी नसल्याचे नगरसेवक नागरिकांना सांगतात. वर्षाला जे बजेट मिळते. ते कोठे खर्च केले, याची माहिती जनतेला दिली पाहिजे. पाणी पुरवठ्याचे प्रोजेक्ट पूर्णपणे थांबले आहेत. आशानगर पाणी टाकीचे काम रखडले आहे. त्यामुळे तेथून नागरिकांना पाणी मिळणे आवश्यक आहे. गटारी, नाले तुंबले आहेत. जनवाडी येथील बी. डी. किल्लेदार मिनी मार्केटचे काम रखडले आहे. बागांची दुरवस्था आहे.’ नीलेश निकम, राष्ट्रवादी कॉंग्रेस
“ड्रेनेज, कचरा आणि पाण्याची समस्या भयाण आहे. ही समस्या सोडविता आलेली नाही. सर्वात भयाण कचऱ्याचा प्रश्न बनला आहे. घंटागाडी कधीकधी येते. स्वच्छ संस्थेची कर्मचारी ठराविक दिवसांनी येतात. त्यामुळे कचरा दररोज उचलला जात नाही. यामुळे कचरा कोठे टाकायचा, हा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. ड्रेनेज व्यवस्था दुर्लक्षामुळे उंदीर, घुशी यांचे प्रमाण वाढले आहे. ड्रेनेजची नियमित दुरूस्ती होत नाही. बागांची दुरवस्था झाली आहे. वीजेची व्यवस्था कोलमडली आहे. बहिरट उद्यानात वराहांचा वावर असतो. हा प्रश्नही सोडविता आलेला नाही.’दत्ता बहिरट, कॉंग्रेस
“मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात पूर्णपणे अपयश आले आहे. ड्रेनेज, पाणी, वीज, शौचालय यासारखे साधे प्रश्नही सोडविण्यात आलेले नाहीत. झोपडपट्टी भागात बजेट वापरण्यात आलेले नाही. त्यांनी बजेट कोठे वापरले, हेही माहिती नाही. काही नगरसेवकांनी राहत असलेल्या भागातही कामे करता आलेली नाहीत. सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्यात येत आहे. प्रभागात विद्यमान नगरसेवक दिसत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. प्रभागातील बागांची दुरवस्था आहे.’ आशा साने राष्ट्रवादी कॉंग्रेस
2022 निवडणुकीसाठी इच्छुक
भाजप : आदित्य माळवे, सतीश बहिरट, मुकारी अलगुडे, प्रभाकर पवार, योगेश बाचल, किरण ओसरे, अपर्णा गोसावी, अपर्णा कुऱ्हाडे, मंगला ढेरे कॉंग्रेस : दत्ता बहिरट, कैलास मंजाळकर, नारायण पाटोळे, बुवा कांबळे, संतोष देसाई, रविंद्र भोसले, राजश्री आडसुळ, प्रियांका पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस : नीलेश निकम, उदय महाले, दयानंद इरकल, बाळासाहेब चव्हाण, अनिता पवार, मंगल पवार, शारदा ओरसे. शिवसेना : आनंद मंजाळकर, प्रवीण डोंगरे, युवराज शिंगाडे, संजय डोंगरे, संजय तुरेकर, नयना वाघ, मनसे : सुहास निम्हण, निलेश निकम, आकाश धोत्रे, शैलेश विटकर, चैतन्य दीक्षित, शंकर पवार. इतर ः विनोद ओरसे, युसूफ शेख, शुभम बहिरट, राकेश विटकर, रमेश भंडारी, तुषार बहिरट, अंजली ओरसे.