पुणे – कौटुंबिक वादासह वेगवेगळ्या तक्रारींबाबत पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षातील महिला सहाय्य केंद्राकडून महिलांना मदत करण्यात आली आहे. गेल्यावर्षी केंद्राकडे दाखल दोन हजार 896 तक्रार अर्जांपैकी 1,675 तक्रारींचे निराकरण करून समेट घडविण्यात आला. यंदाच्या वर्षी फेब्रुवारी अखेरीपर्यंत 498 पैकी 51 तक्रारींचे निराकरण केले.
पुणे पोलिसांच्या भरोसा कक्षातील महिला सहाय्य केंद्राकडून कौटुंबिक वादाचे निराकरण केले जाते. दाम्पत्यातील वाद समुपदेशनाने सोडवून त्यांच्यात समेट घडविला जातो. महिलेची तक्रार आल्यानंतर शक्यतो वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केला जातो. रस्त्यावर सडकसख्याहारींकडून दिला जाणारा त्रास, कार्यालयातील सहकाऱ्यांकडून होणारी शेरेबाजी तसेच असभ्य वर्तन अशा तक्रारींची दखल घेऊन कारवाई केली जाते. कौटुंबिक वादापासून रस्त्यावरच्या त्रासाचे निराकरण करण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे, असे महिला सहायक कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शामने यांनी नमूद केले.
भरोसा कक्षात एकाच छताखाली महिला, बालके तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तसेच तक्रारी जाणून घेतल्या जातात. महिला सहाय्य कक्षात एखाद्या महिलेने तक्रार अर्ज दिल्यास तिला पोलीस मदत उपलब्ध करून दिली जाते. वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशन, कायदेविषयक मदत उपलब्ध करून दिली जाते. महिलेला दिला जाणारा त्रास तसेच त्याचे निराकरण करण्यासाठी सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाते. कौटुंबिक वादातही दाम्पत्याला बोलावून दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातात. घटस्फोट घेण्यासारखा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांचे समुपदेशन केले जाते. एखाद्या महिलेला कौटुंबिक हिंसाचारास सामोरे जावे लागत असेल तर तिला मदत केली जाते. सासरकडील नातेवाईकांना बोलावून त्यांचेही समुपदेशन केले जाते. समुपदेशनामुळे अनेकांचे संसार सुरळीत झाले आहेत, असे त्यांनी सांगितले.
महिलांसाठी हेल्पलाइन
महाविद्यालय, शाळाबाहेर एखादी मुलगी, युवतीला त्रास दिला जात असल्यास तिला त्वरित मदत उपलब्ध करून देण्यासाठी दामिनी पथक कार्यरत आहे. रस्त्यावर दिला जाणाऱ्या त्रासाची तक्रार दिल्यास त्वरित कारवाई केली जाते. महिलांच्या तक्रारी स्वीकारणे तसेच निराकरण करण्यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष क्रमांक (हेल्पलाइन क्रमांक-1091) उपलब्ध करून दिला आहे. दूरध्वनी सेवा चोवीस तास सुरू असते, असे सहायक पोलीस निरीक्षक सुजाता शानमे यांनी सांगितले.