दीपक मानकर : पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना दिले निवेदन
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात शैक्षणिक आणि आयटी उद्योगाच्या भरभराटीमुळे देशभरातून पुण्यात राहण्यास येणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसंख्यावाढी सोबतच शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून गुन्हेगारीमुक्त पुणे शहरासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी केली आहे.
शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काॅग्रेसच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची भेट घेऊन दिले. यावेळी उपाध्यक्ष दत्ताभाऊ सागरे, महिला अध्यक्ष प्रिया गदादे, युवक अध्यक्ष समीर चांदेरे, युवती अध्यक्ष पुजा झोळे, विद्यार्थी अध्यक्ष शुभम मातोळे, प्रवक्ते भैय्यासाहेब जाधव, शिवाजी नगर विधानसभा अध्यक्ष अभिषेक बोके, अॅड. पुष्कर दुर्गे उपस्थित होते.
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनी तसेच नोकरीनिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांना रोडरोमियांचा त्रास होत असल्याच्या अनेक घटना पुढे येत असल्याने ऑफिसेस व महाविद्यालये सुटतेवेळी मार्शलच्या माध्यमातून गस्त घालण्यात यावी, कोयतागँग सारख्या गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
यावेळी दीपक मानकर म्हणाले, शहरात अनेक भागांमध्ये अवैध हॉटेल्स, पब, हुक्का पार्लर सुरू असल्याने आजची युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. शहरात खुलेआमपणे मसाज सेंटरमध्ये बेकायदेशीर कृत्य केले जाते, ऑनलाइन गेम पार्लर, जुगार मटका चालवणाऱ्यांमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून हे सर्व थांबवण्यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करण्याची गरज आहे.