पुणे – पुणे शहरातील ऐतिहासिक गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेने बंदोबस्तात पोलिसांना विशेष सहकार्य केले. पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मंडई, लक्ष्मी रोड तसेच अलका टॉकीज चौकात विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तात सहकार्य करण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्ते असे शंभराहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.
पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य –
पोलिस मित्र संघटना ही एक मान्यताप्रात संघटना असून गेली 30 वर्षे पोलीस त्यांचे कुटुंबीय व नागरिकांसाठी कार्यरत आहे. संघटनेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. 1987 साली या संघटनेची स्थापना झाली असून राजेंद्र कपोते हे या पोलिस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
पोलीस व नागरिक यांच्यामधील मैत्रीचा दुवा म्हणून संघटना कार्य करीत असून नागरिकांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवित आहे. यामध्ये रक्तदान, आरोग्य शिबिरे, जेष्ट नागरिकांचे सत्कार, आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये फराळाचे वाटप, थंडीत अनाथ आश्रमात व फूटपाथ वरील नागरिकांसाठी ब्लॅंकेट वाटपाचे कार्य केले जाते. गणेशोत्सवामध्ये विसर्जन मिरवणुकीत व इतर धार्मिक सणा दरम्यान, मोर्चे, मिरवणुका इत्यादींमधे संघटनेचे कार्यकर्ते पुणे व पिंपरी चिंचवड येथे मोठया प्रमाणात पोलिसांना बांदोबस्तात सहकार्य करत असतात.