रायपूर – मध्य प्रदेशच्या शेजारचे राज्य असलेल्या छत्तीसगडमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा दिवसांत सलग दुसऱ्यांदा या राज्याला भेट देत कॉंग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. मोदी म्हणजे गॅरेंटी असे नमूद करतानाच राज्यातील कॉंग्रेसचे सरकार केंद्र सरकारला सहकार्य करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. ( Chhattisgarh Election 2023)
विलासपूर येथे झालेल्या प्रचारसभेत बोलताना ते म्हणाले की येथे दिसणारा उत्साह ही राज्यात होणाऱ्या परिवर्तनाची नांदी आहे. कॉंग्रेसच्या अत्याचारामुळे त्रस्त झालेल्या येथील जनतेने आता परिवर्तनाचा निर्धार केला आहे. कॉंग्रेसच्या राजवटीत छत्तीसगड भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहे. रोजगाराच्या नावाखाली केवळ घोटाळे सुरू आहेत.
प्रत्येक योजनेच्या नावाखाली फक्त भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे हे सरकार घालवून भारतीय जनता पार्टीचे सरकार आणण्यासाठी जनता उत्सूक असल्याचे दिसत असल्याचा दावा मोदी यांनी केला.
भाजपचे केंद्रातले असो वा राज्यातले सरकार छत्तीसगडच्या विकासासाठी पूर्णत: समर्पित आहे. तुम्ही पुन्हा भाजपची सत्ता आणली तर तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार अशी हमी मी तुम्हाला देतो. तुमचे स्वप्न हाच माझा संकल्प आहे असे नमूद करत ते म्हणाले की मी दिल्लीत जेवढे प्रयत्न करतो तेवढे ते प्रयत्न अपयशी ठरण्यासाठी येथील कॉंग्रेसचे सरकार काम करते.
गेल्या पाच वर्षांत राज्याला हजारो कोटी रूपये मिळाले. येथे रस्ते व्हावेत, रेल्वे यावी, विजेचा प्रश्न संपावा यासाठी कधीच हात अखडता घेतला नाही आणि हे मी नाही तर येथील कॉंग्रेसच्या सरकारमधील उपमुख्यमंत्रीच म्हणत आहेत असेही मोदी म्हणाले.
केंद्रात जेंव्हा कॉंग्रेसचे सरकार होते तेंव्हा छत्तीगडला रेल्वेचे वर्षाला सरासरी 300 कोटी रूपये मिळायचे. मात्र केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या राज्यातील रेल्वेच्या विकासासाठी 6 हजार कोटी रूपये दिले. हेच मोदी मॉडेल आहे आणि छत्तीसगडवरचे माझे प्रेम असल्याचे त्यांनी नमूद केले.
कॉंग्रेसने गरिबांवर अन्याय केला, त्यांना तुमच्याशी काही कर्तव्य नाही. त्यांनी गोमातेच्या नावानेही घोटाळा केला. राज्यातील भूपेश बघेल सरकारने शेतकऱ्यांची केवळ फसवणूकच केली असे अन्य आरोप करत त्यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले.
छत्तीसगढ़ की तेज प्रगति के लिए भाजपा संकल्पबद्ध है। बिलासपुर में विशाल जनसभा को संबोधित कर रहा हूं। https://t.co/ZNYR4t4XQ6
— Narendra Modi (@narendramodi) September 30, 2023