Asian Games 2023 : 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला नववे सुवर्णपदक मिळाले आहे. रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी मिश्र दुहेरीत सुवर्णपदक पटकावले आहे. भारतीय जोडीने अंतिम फेरीत चिनी तैपेईची जोडी त्सुंग-हाओ हुआंग आणि एन-शूओ लियांग या जोडीचा 2-6,6-3,10-4 असा पराभव केला. भारतीय जोडीने अंतिम सामन्यातील पहिला सेट गमावला होता. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी शानदार पुनरागमन करत अखेर सुपर टाय ब्रेकमध्ये 10-4 असा सामना जिंकला
2002 च्या आशियाई खेळापासून या खेळात सुवर्णपदक जिंकण्याचा भारताचा सिलसिला कायम आहे. ४३ वर्षीय रोहन बोपण्णा आता दोन वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेत चॅम्पियन आहे! त्याने 2018 मध्ये दिविज शरणसह पुरुष दुहेरी जिंकली आणि आता ऋतुजा भोसलेसह मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले आहे.तर ऋतुजा भोसलेची आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिलीच फायनल होती.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने दोनदा मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले आहे. लिएंडर पेस आणि सानिया मिर्झा यांनी 2006 मध्ये दोहा येथे सुवर्णपदक जिंकले होते.
अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास…
टेनिसच्या पहिल्या फेरीत भारताच्या मिश्र जोडीला बाय मिळाला. दुसऱ्या फेरीत, त्यांनी उझबेकिस्तानच्या अकगुल अमानमुराडोवा-मॅक्सिम शिन यांचा 6-4, 6-2 असा पराभव केला, तर 16 च्या फेरीत अयानो शिमिझू-शिंजी हाझावा यांचा 6-3, 6-4 असा पराभव केला. रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले यांनी टेनिसच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत कझाकस्तानच्या झिबेक कुलुम्बेवा-ग्रिगोरी लोमाकिन या जोडीचा 7-5,6-3 असा पराभव केला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला जेथे त्यांनी चायनीज तैपेई जोडीचा पराभव केला.