पुणे : ललित पाटील प्रकरणाचा पर्दाफाश झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी आणखी मोठी कारवाई करत तब्बल कुरकुंभ येथील कारखाण्यातुन १४०० कोटींचे तब्बल ७००किलो ड्रग्ज जप्त केले. पुणे पोलिसांच्या विविध पथकांनी छापा टाकून अवैधरित्या कुरकुंभ येथील एमआयडीसीमध्ये सुरू असलेला मेफेड्रॉनचा कारखाना उध्वस्त केला.
तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांच्या १० टिम देशभरात छापेमारी करत असून यादरम्यान दिल्लीत ४०० किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून या प्रकरणात अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत वर्तवली.
यावेळी सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार आणि गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे उपस्थित होते. कुरकुंभ, पुणे आणि दिल्ली येथे छापेमारून २ हजार २०० कोटीपेक्षा जास्त किंमतीचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी कारवाई करत सुरुवातीला चार कोटींचे ड्रग जप्त केले होते .त्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करत, विश्रांतवाडी येथे दोन गोदामांवर छापा टाकला.
यामध्ये मिठाच्या गोदामात लपवून ठेवलेले 55 किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. हाच धागा पकडत तपास पथकांनी युद्ध पातळीवर तपास करत, कुरकुंभ एमायडीसी मधील एमडी ड्रग बनवणाऱ्या कंपनीवर छापा टाकला आहे.
मेफेड्रॉनचे उत्पादन सुरू असलेली कंपनी नगर जिल्ह्यातील अनिल साबळे व्यक्तीने अर्थ केम प्रायव्हेट लिमिटेड नावाने सुरु केली . याप्रकरणी साबळेला ताब्यात घेण्यात आले आहे. याच बरोबर मेफेड्रॉन बनविण्याचा फार्मुला देणाऱ्या केमिकल इंजिनियरला डोंबिवली येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कटाचा सहभाग असून विविध परदेशी व्यक्तींचा देखील यामध्ये सहभाग निष्पन्न होत असल्याने त्या दृष्टीने तपास पथके कामाला लागली आहेत. या प्रकरणात राज्यासह देशभरात विविध शहरांमध्ये पुणे पोलीस छापे घालत आहे. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे.
साबळेची ही कंपनी ऑक्टोबर २०२३ पासून सुरु होती. या व्यवसायामागील मुख्य ब्रेन एक परदेशी नागरिक असल्याचे पुढे आले आहे. त्याचा युध्दपातळीवर शोध सुरु करण्यात आला आहे. दरम्यान हे अंमली पदार्थ मुंबईमार्गे इतर राज्यातही पाठवण्यात येत असल्याचे उघड झाले.