नवी दिल्ली – रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याविरोधात ऍलेक्सी नवालनी यांनी सुरू केलेला लढा त्यांच्या पश्चात देखील सुरू ठेवण्याचा निर्धार नवालनी यांच्या विधवा पत्नीने व्यक्त केला आहे. युलिया नवालनया यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला असून पुतीन यांनीच आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान नवालनी यांचा मृतदेह अजूनही त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आलेला नाही. मृतदेह ज्या शवागारामध्ये ठेवण्यात आला आहे, तेथे नवालनी यांच्या आईला प्रवेश नाकारण्यात आला आहे. नवालनी यांची हत्या झाली असल्याचे उघड होऊ नये म्हणूनच मृतदेह आपल्या सासूच्या ताब्यात दिला जात नसल्याचा आरोप युलिया नवालनया यांनी केला आहे.
नवानली यांच्या मृत्यूचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही. शवविच्छेदनातून मिळालेले निष्कर्ष परदेशातून तपासले जात आहेत, असे रशियाच्या अधिकार् यांनी म्हटले आहे. नवाननी यांच्या मृत्यूला पश्चिमेकडील अनेक नेत्यांनी पुतीन यांनाच जबाबदार धरले आहे. आपल्या पतीच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि पुतीन यांना जाब विचारण्यासाठी रशियातील जनतेने आणि अन्य राजकीय पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही युलिया नवालनया यांनी केले आहे.
नवालनी यांच्या मृत्यूमुळे पुतीन यांना रशियामध्ये कोणीही राजकीय प्रतिस्पर्धी उरला नाही. आता पुतीन यांना अध्यक्ष म्हणून आणखीन ६ वर्षांचा कार्यकाळ सहज मिळवता येऊ शकतो.