पुणे – पुणे पोलीस आयुक्तालयात शहरातील ३२ टोळ्यांतील टोळी प्रमुखांसह २६७ गुन्हेगारांची हजेरी घेण्यात आली. या गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी कृत्य न करण्याची तसेच रिल्स न बनविण्याची तंबी देण्यात आली. पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे गुन्हेगारी टोळ्यांना समोरा समोर बोलावून सज्जड दम देण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार ( Police Commissioner Amitesh Kumar) यांनी हा गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचा हा ‘नागपुर पॅटर्न ’ पुणे शहरात राबविण्याचे ठरवले आहे.
कायद्याशी खेळाल तर आम्ही तुमच्याशी खेळू – अमितेश कुमार
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी आयुक्त पदाची सुत्रे स्विकारली. सर्वप्रथम त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवैध धंदे आणि मांडवली बंद करण्याचे आदेश दिले. यानंतर शहरातील सर्व गुन्हेगारांची कुडली नव्याने तयार करण्यास सांगण्यात आले. या सर्व गुन्हेगारांची आज (मंगळवार) पोलीस आयुक्तालयात परेड घेण्यात आली. शहरातील जुन्या ११ टोळ्या आणि रायझिंग २१ टोळ्यांतील २६७ गुन्हेगारांची हजेरी घेतली गेली. त्यांची पोलीस उपायुक्त(गुन्हे) अमोल झेंडे, सहायक आयुक्त (गुन्हे) सुनिल तांबे आणि सतिश गोवेकर यांनी झाडाझडती घेतली. त्यांना कोणत्याची प्रकारे रिल्स न बनविण्याची तसेच गुन्हे न करण्याची तंबी देण्यात आली.
दरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, गुन्हेगारांची सविस्तर कुंडली तयार करण्यात येणार आहे. ती डिजिटल स्वरुपातही रेकॉर्डला ठेवण्यात येईल. तसेच रायझिंग टोळ्या आणि अल्पवयीन गुन्हेगारांचे मनपरिवर्तन करण्यात येईल. मी येथे येण्याअगोदर काय झाले माहित नाही, मात्र आता यापुढे कोणतेही गुन्हेगारी कृत्य होता कामा नये. ‘गुन्हेगारांनी कायद्याशी खेळू नये, अन्यथा आम्ही त्यांच्याशी खेळू’ अशा शब्दांत इशारा दिला गेला.
-बाबा बोडके, गजानन मारणे , गणेश मारणे आणि निलेश घायवळ एकाच रांगेत
शहरातील जुन्या टोळ्यांचे एकमेकांशी कट्टर वैमनस्य असलेले टोळी प्रमुख प्रथमच एका रांगेत उभे राहिलेले बघायला मिळाले. यामध्ये बाबा बोडके, गजानन मारणे, गणेश मारणे, आणि निलेश घायवळ यांचा समावेश होता. एकमेकांशी वैमनस्य असले तरी येताना शिस्तीत आणि जातानाही ते शिस्तीत गेल्याचे दिसले. या व्यतिरीक्त जुन्या टोळ्यांमधील बंटी पवार, बंडू आंदेकर, उमेश चव्हाण, बापु नायर, खडा वसिम आणि अन्वर नवा यांचा समावेश होता. यांच्या टोळीतील १२३ सदस्य उपस्थित होते.