पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्ताची कडेकोट आखणी केली आहे. त्यासाठी पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबादारी असलेले एसपीजीची (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) पथके, एसआपीएफ, फोर्स-वनचे जवान तैनात असणार आहेत. कार्यक्रम स्थळाची बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाने पाहणी केली असून, दि. 28 जुलैपासून ते कार्यक्रम होईपर्यंत दौऱ्याचा परिसर “नो फ्लाइंग झोन’ करण्यात आला आहे.
मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटनदेखील होणार आहे. दि. 1 ऑगस्ट रोजीच्या या दौऱ्यासाठी प्रशासकीय तसेच सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. यात प्रामुख्याने पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, स्मार्तना पाटील, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांच्यासह पथक पंतप्रधानांच्या दौऱ्यावर लक्ष ठेवून आहेत.
शुक्रवारी (दि.28) पंतप्रधानांच्या केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी (एसपीजी) त्यांच्या पुणे दौऱ्यांचा आढवा घेतला. एसपीजीच्या पथकाने पंतप्रधान उतरणार असलेले हेलिपॅड, कार्यक्रमाची ठिकाणे, ताफा जाणाऱ्या रस्त्यांची पाहणी केली. या दौऱ्यावेळी वाहतूक व्यवस्थेतील बदल, बंदोबस्त, उद्घाटन ठिकाणांची तपासणी, साध्या वेशातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांची जबाबदारी यावर चर्चा करण्यात आली. त्याशिवाय दौऱ्यावेळी काही रस्तेही नागरी वाहतुकीसाठी बंद असतील.
शहरातील प्रवास रस्तेमार्गे
पंतप्रधान मोदी यांचा हा एकदिवसीय दौरा असणार असून, विमानाने ते लोहगाव येथील हवाई दलाच्या टेक्निकल एअरपोर्ट येथे येतील. त्यानंतर ते हेलिकॉफ्टरने शिवाजीनगर (सिंचननगर) येथील ऍग्रीकल्चर कॉलेजच्या मैदानावर पोहचतील. पुढे ते वाहनाने रस्तेमार्गे सर्व नियोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आहेत.