पुणे –पुणे महानगर परिवहन महामंडळाने “पीएमआरडीए’च्या हद्दीमध्ये सेवा विस्तारण्यास सुरुवात केली आहे. आगामी टप्प्यात वेल्हा, लोणावळा आणि मंचर या भागांतही बससेवा सुरू करण्याचा नवा प्रस्ताव विचाराधीन आहे.मात्र, या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून मात्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून शहरातील बससेवा सुधारण्याची मागणी करण्यात येत आहे.
पीएमपीने डिसेंबर महिन्यापासून पीएमआरडीएच्या हद्दीतील विविध मार्गांवर सेवा देण्यात येत आहे. सध्या शहराच्या आजूबाजूच्या सुमारे 15 पेक्षा अधिक मार्गांवर बसेस धावत आहेत. यात नुकतीच पुणे-वांगणी (वेल्हा) या मार्गाची भर पडली आहे. तर येत्या काळात देखील तीन नवे मार्ग विस्तारण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाला वरिष्ठ अधिकारी देखील दुजोरा देत आहेत.
वेल्हा, लोणावळा, मंचर या भागातील स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. पीएमपी प्रशासन लवकरच पुणे- वेल्हा, पुणे-लोणावळा, पुणे-मंचर अशी सेवा देण्याच्या विचाराधीन आहे. मात्र या प्रस्तावाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पीएमपीचे मुख्य क्षेत्र असणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सेवा देताना प्रशासनाची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. एका बाजूला शहरात बसेसच्या कमतरतेअभावी बससेवा सुरळीत नाही. तर दुसरीकडे जिल्ह्यामध्ये नवीन मार्ग सुरू करण्यात येत आहेत. शहराबाहेरील प्रवाशांना सुविधा देण्यास नकार नाही. पण प्रशासनाने शहरातील सेवेकडे देखील लक्ष देणे आवश्यक असल्याचे पीएमपी प्रवासी मंचाचे सचिव संजय शितोळे यांनी सांगितले.