पुणे – पीएमपीला मिळणार नवीन ई-तिकीट मशीन्स

दैनिक “प्रभात’च्या वृत्तानंतर सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाला प्रस्ताव

पुणे – “पीएमपीएमएल’ला महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या ई-तिकीट मशीन्सची देखभाल दुरुस्तीच न झाल्याने या मशीन्स भंगारात निघाल्या आहेत. त्याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या मशीन नव्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा ठेका असलेल्या सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाला तसा प्रस्ताव देण्यात आला आहे.

छापील तिकिटे देताना आणि त्यावर पंचिंग करताना वाहकांना त्रास सहन करावा लागत होता. यासाठी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून साडेचार हजार मशीन्स भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. त्याची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबधित बॅंकेवरच होती. त्याशिवाय सहा महिन्यातून या मशीन्स सर्व्हिसिंगसाठी देण्याची जबाबदारी पीएमपीएमएल प्रशासनावर सोपविण्यात आली होती, त्यासंबधी संबधित कंपनी आणि प्रशासन यांच्यामध्ये लेखी करारही झाला आहे.

पण, गेल्या तीन वर्षांत या मशीन्सची एकदाही सर्व्हिसिंग अथवा देखभाल तसेच दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे चार्जिंग असतानाही मशीन्स बंद पडणे, अर्धवट तिकिट निघणे, तिकिटावरील अक्षरे पुसट असणे, तिकीट अडकणे, मशीनची बटने दबली न जाणे आदी त्रासाला वाहकांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात अनेक वाहकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. याची दखल घेत पर्यायी व्यवस्था म्हणून प्रशासनाने सर्व वाहकांना छापील तिकिटांचा ट्रे दिला आहे. त्यामुळे मशीन, ट्रे आणि हिशेब सांभाळताना वाहकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासंदर्भात दैनिक “प्रभात’ ने 27 मार्चच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन ही मशीन्स पूर्णपणे बदलून देण्याचा प्रस्ताव सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाला दिला आहे, अशी माहिती पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी “प्रभात’ला दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.