पुणे- शहरात दोन दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा निर्माण होत आहे. याचा परिणाम पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) सेवेसह सीएनजी वाहनांवरदेखील झाला होता. त्यामुळे रविवारी पीएमपीच्या शेकडो बसेस उशिराने धावत होत्या. तर गॅस पंपावर बसेसच्या लांब रांगा लागल्या होत्या. तासनतास रांगेत उभे राहावे लागल्याने वाहनचालकदेखील ताटकळले होते.
पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 1 हजार 600 सीएनजी बसेस आहेत. त्यापैकी दररोज सुमारे 1 हजार 300 बसेस संचलनात असतात. तर हडपसर, कात्रज, कोथरूड आणि न.ता.वाडी या आगारांमध्ये पीएमपीचे पंप आहेत. या ठिकाणी शनिवारपासून कमी दाबाने गॅसपुरवठा कमी होत असल्याने, अनेक बसेसना गॅसपुरवठा होऊ शकला नाही. शनिवारी गॅसअभावी अनेक बसेस मार्गांवर सोडण्याऐवजी आगारांमध्ये उभ्या कराव्या लागल्या. तर रविवारी विविध आगारांमध्ये बसेसच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी मार्गावरील बसेसची संख्या कमी असल्याने प्रवाशांचीदेखील गैरसोय झाली होती. सीएनजीच्या अपुऱ्या दाबामुळे बसेसच्या गॅसपुरवठ्यावर परिणाम झाला होता. यामुळे काही बसेस मार्गावर रवाना होण्यास उशीर झाला होता. एकूण प्रभावित झालेल्या बसेसची संख्या सोमवारी समजू शकेल, अशी माहिती वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली.
प्रवासी ताटकळले…
गॅस भरण्यासाठी रविवारी रात्री उशिरा बसेसच्या लांब रांगा कायम
कर्मचाऱ्यांकडून बस येण्याबाबत योग्य उत्तरे मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ
मुक्कामी बसेसना उशीर
काही फेऱ्या रद्द