पुणे – पीएमपीचा 2024 कृती आराखडा

तूट कमी करण्यासाठी नियोजन : नयना गुंडे यांच्याकडून सादरीकरण

पुणे – तोट्यातील मार्ग बंद करणे, डेड किलोमीटर कमी करण्यासाठी शहराच्या हद्दीजवळ 7 ठिकाणी नवीन बस डेपो उभारणे, वाहकांना उत्पन्नांचे निश्‍चित उद्दीष्ट, जाहिरातींचे उत्पन्न वाढविणे अशा सुमारे दहा ते 12 स्तरावर वेगवेगळ्या उपाययोजना करून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल)कडून संचलन तूट कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिली. गुंडे यांनी मंगळवारी स्थायी समितीत कृती आराखड्याचे सादरीकरण केले असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी गुंडे यांनी प्रामुख्याने पीएमपीच्या वाढती संचलन तूट कमी करण्यासाठी भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. त्या पूर्वी त्यांनी 2018-19 मध्ये आलेल्या 244 कोटी 55 लाख रुपयांच्या तुटीची माहिती दिली. त्यानंतर सदस्यांकडून ही तूट भरून काढण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती विचारली. यावेळी गुंडे यांनी सुमारे 10 ते 12 उपाययोजनांची माहिती दिली. त्यात वारजे माळवाडी, मुंढवा, विश्रांतवाडी, कोंढवा, येवलेवाडी, म्हाळूंगे तसेच वडगाव या ठिकाणी बसस्थानके तसेच डेपोचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच, रूट समितीची स्थापना शहरातील तोट्यातील मार्ग बंद करण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची विस्तृत माहिती दिली. याशिवाय, भविष्यात वाहनांना उत्पन्नाचे उद्दीष्ट ठरवून दिले जाणार असून उत्पन्न कमी असणाऱ्या वाहकांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

याशिवाय, पीएमपीच्या इमारतींचे भाडे, जाहिरात शुल्क वाढविण्यासाठीही उपाययोजना करण्यात येत असून प्रवाशांच्या मागणीनुसार, गर्दीच्या वेळी या पुढे जादा ब्रोकन शेड्युल संचलनाचे नियोजन करणे, 270 आर्युमान संपलेल्या बसेसमधून गेल्यावर्षी 105 तर यावर्षी 165 बसेस ताफ्यातून बाद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, बसेसच्या देखाभाल दुरुस्तीची काटेकोरपणे अंमलबजावणी करून ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी करण्यासह, कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी डेपो मॅनेजरचे तपासणी पथक, महिला तपासणी पथक व दक्षता पथकाची नेमणूक करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.