खडकवासला (विशाल भालेराव) – महानगर पालिकेचा रणसंग्राम सुरू झाला आहे. प्रभाग रचनादेखील जवळपास अंतिम होत आहे. आता नेते आणि त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. फोडाफोडी, आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण प्रभाग क्रमांक 53 खडकवासला-नऱ्हे येथे रंगू लागले आहे. या प्रभागातील इच्छुक जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्षांनी तिकीट दिले नाही, तर प्रसंगी अपक्ष लढण्याची तयारी मातब्बर नेत्यांनी केली आहे.
या प्रभागात किरकटवाडी, नांदेड गावठाण, मानाजी नगर, ग्रीनलॅंड कौंटी, अदित्य संस्कृती, आसावरी सोसायटी, सीडब्ल्यूपीआरएस, डीएसके, मेघमल्हार सोसायटी, सणस विद्यालय, मधुवंती सोसायटी इत्यादी भाग येतो. येथील एकुण लोकसंख्या 63,525 ऐवढी आहे. या प्रभागातील अरुंद रस्ते, महानगर पालिकेच्या आरोग्य सुविधांचा अभाव, विस्कळीत ड्रेनेज व्यवस्था, सततची वाहतूक कोंडी अशा अनेक समस्याना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.
या प्रभागातील बहुतांश भाग पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झाला आहे. त्यामुळे प्रभागाचा “पहिला नगरसेवक’ बनण्याची इच्छा धरून सर्वच पक्षांकडे उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे चित्र आहे.
विशेषत: राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यांचे आधीचे लोकप्रतिनिधी, सक्रिय कार्यकर्ते यांची उमेदवारीसाठी रांग लागली आहे. या प्रभागातून साधारणतः 50 जण इच्छुक असून, अशा वेळेस पक्षातल्या दिग्गजांना “ऍडजेस्ट’ कुठे करायचे, असा मोठा पेच राजकीय पक्षांसमोर निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यात अनेकांचे वार्ड राखीव झाले, तर त्यांना कुठे उमेदवारी द्यायची, हाही प्रश्न आहेच. विरोधी पक्षातही हेच चित्र दिसते. शिवसेनेतही उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात आले. कॉंग्रेसकडूनही बऱ्याच जणांनी दावे केले आहेत. भाजपकडूनही बऱ्याच मातब्बर मंडळींनीही शड्डू ठोकण्याची तयारी केली आहे. तर, अन्य पक्षांकडून उमेदवारी मागण्यासाठी सक्रिय कार्यकर्त्यांसह हौशी मंडळींचाही समावेश आहे.
इच्छुकांची रांग मोठी
गेली काही वर्षे ज्यांनी पक्षाच्या माध्यमातून काम केले, त्यांनी तर उमेदवारीवर दावा केलाच आहे. मात्र, अनेक बांधकाम व्यावसायिक, आर्थिक बळ असलेलेही इच्छुकांच्या रांगेत उभे आहेत. यामुळे सर्वच पक्षात उमेदवारीचे वाटप करताना नाराजांची संख्या वाढण्याची तसेच काही प्रमाणात बंडखोरीचीही शक्यता आहे.