पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पुणे महानगर नियोजन समितीची 30 सदस्य पदाची निवडणूक ही बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे. पालिका क्षेत्रातून 22 सदस्य निवडून द्यायचे आहेत.
नगरसेवकपदाचा कार्यकाळ हा पुढील चार ते पाच महिनेच बाकी राहिला असल्याने ही निवडणूक बिनविरोध करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार 30 जागांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरला असून यामध्ये सर्वाधिक 16 जागा या भाजपला तर महाविकास आघाडीला 14 जागा मिळणार आहे.
पीएमआरडीएने नुकताच हद्दीचा प्रारुप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. ही समिती हा विकास आराखडा अंतिम करणार आहे. त्यामुळे ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकेमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. तर ग्रामीण भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली होती. ग्रामीण भागात राष्ट्रवादी मानणारे किती सरपंच आहेत. इतर पक्षांचे किती सरपंच आहेत. याची माहिती घेतली. त्यानुसार प्रत्येक पक्षाला किती जागा द्याव्या लागतील. या समितीमध्ये ताकदीनुसार स्थान देण्याबाबत चर्चा झाली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पक्षनिहाय जागा वाटपावरदेखील या बैठकीत निर्णय झाल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
असे असू शकते जागावाटप
पुणे व पिंपरी पालिका क्षेत्रातील 22 जागांपैकी 14 जागा भाजपला मिळणार आहेत. उर्वरित जागा महाविकास आघाडीला, नगरपंचायत क्षेत्रातील एक जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला तर ग्रामीणमधील 7 जागांपैकी दोन जागा भाजपला, चार राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणि एक कॉंग्रेसला मिळणार असल्याची शक्यता आहे.