पुणे – एसटी बसमधील राखीव आसनांच्या क्रमांकामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये दिव्यांग प्रवाशांना दिलासा म्हणून ३, ४, ५, ६ या दरवाजाजवळील सीट राखीव असतील. तर, आमदारांना १, २ ऐवजी ७ व ८ क्रमांक ही आसने राखीव असतील. दि. १ जानेवारीपासून हा बदल लागू होत आहे.
एसटी महामंडळाच्या विविध बसमध्ये विधिमंडळ सदस्य, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक, महिला, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, एसटी कर्मचारी यांच्यासाठी राखीव आसन व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. निमआराम, शिवाई, शिवशाही या बसमध्येदेखील हा नियम लागू असेल.
ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या साध्या बसमध्ये तीन, चार आणि पाच ऐवजी ११ आणि १२ ही आसने राखीव राहतील. तर, निमआराम, शिवाई, शिवशाही बसमध्ये देखील ११ व १२ ही आसने राखीव. तर शयनायनमध्ये सहा क्रमांकाचे आसन राखीव राहील. स्वातंत्र्य सैनिकांना साध्या बसमध्ये सहा व सात ऐवजी १३ व १४ क्रमांकाची आसने राखीव असतील.
अधिस्विकृतीधारक पत्रकारांसाठी साध्या बसमध्ये २५ आणि २६ ऐवजी आता २७ व २८ क्रमांकाचे आसन राखीव असेल. तसेच, निमआराम, शिवाई, शिवशाही बसमध्ये देखील हीच आसने राखीव असतील. मात्र, यामध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी साध्या बसमध्ये ३१ व ३२ क्रमांकाचे आसन राखीव असेल. इतर बसमध्ये त्यांच्यासाठी आसन राखीव असणार नाही.
महिलांनाही राखीव सीट
महिलांना साध्या बसमध्ये १९,२०,२१,२२, २९,३० ही आसने राखीव ठेवली जातील. तसेच, निमआराम, शिवाई, शिवशाही बसमध्ये हीच आसने राखीव असतील. शयनायन बसमध्ये चार व पाच क्रमांकाची आसने राखीव असतील.