वडगाव मावळ – मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम सुरू आहे. या कामाची मुदत संपून देखील अद्यापही काम पूर्णत्वाला गेले नसल्याने ठेकेदार मनमानी पद्धतीने काम उरकण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी सुरक्षेतेच्या बाबतीत सांगण्यात आलेल्या उपाययोजनांकडे कानाडोळा करत फक्त काम उरकण्याकडे ठेकेदाराचे लक्ष असल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.
द्रुतगती मार्गावर वारंवार होणारे अपघात, अतिवेगात गाडी चालविणे, ठराविक ठिकाणी होणार्या चोरी दरोडाच्या घटना या सर्वांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम 18 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापही अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत. मुदती बाहेर काम गेल्यामुळे ठेकेदाराला दंडही होऊ शकतो यामुळे ठेकेदार मनमानी पद्धतीने काम उरकण्याच्या मागे लागला असून ठेकेदाराला काम करणार्या कामगारांची ही काळजी दिसत नाही.
सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी अकुशल कारागिरांचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले असून या कामगारांकडून गुणवत्ता पूर्ण काम होण्याची हमी कशी भेटणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याशिवाय ज्या ठिकाणी काम सुरू आहे तेथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे इंजिनियर फिरकतही नाहीत. याठिकाणी काम करणार्या कामगारांना हेल्मेट रिफ्लेक्टर जॅकेट जरी देण्यात आले असले तरी ठेकेदाराचे सुपरवायझर व इंजिनियर हे मालक असल्यासारखे वावरत असून कुठल्याही प्रकारची सुरक्षा साधने न घालताच त्यांचा याठिकाणी मुक्त वावर आहे. ज्या ठिकाणी क्रेन उभी करण्यात येते त्या ठिकाणी बॅरिगेट्स लावण्यात येत नाहीत. यामुळे दोन ते तीन वेळा या क्रेन्सला गाड्या वेगात घासून गेल्या आहेत. लेन अचानक बंद होत असल्याने द्रुतगती मार्गावरील वाहन चालक ही यामुळे काहीसे गोंधळलेले असतात. यामुळे भविष्यात जर एखादा मोठा अपघात जर झाला तर याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल द्रुतगती मार्गावरून प्रवास करणारे रमेश पाटील यांनी विचारला.
कामगारांनाच दमदाटी
लोणावळा शहरालगत ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी किमान 100 मीटर मागे वाहन चालकांना लाल झेंडा दाखवून वाहने त्या लेन वरून दुसरीकडे फिरवा. वाहन चालकांना सावध करा. त्यामुळे अपघात होणार नाही असे वारंवार सांगून देखील सुपरवायझर या गोष्टीकडे कानाडोळा करत आहे. त्यादिवशी चिडून त्याने यासाठी माणूस कुठून आणणार? असा उलटा सवाल मलाच करत जमत असेल तर काम कर नाहीतर दुसरा माणूस बघतो, अशी माहिती एका कामगाराने नाव न घेण्याच्या अटीवर दिली.