राष्ट्रपती, सरन्यायाधीशांसह अभिनेते यांनी घेतले दर्शन, देवस्थानचा विषय गाजला अधिवेशनात
रवी शेटे
शनिशिंगणापूर – नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूरात सन 2023 या सरत्या वर्षात ४० लाखांहून अधिक भाविकांनी शनीचरणी नतमस्तक होत मनोभावे दर्शन घेतले. यात प्रामुख्याने भारताच्या राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, विविध राज्यातील खंडपीठाचे न्यायमूर्ती, देशातील व राज्यातील राजकारणी, उद्योगपती सिनेअभिनेते, खेळाडू यांचा समावेश आहे. अधिक मास, श्रावण महिना, शनिअमावस्यालेला झालेल्या उच्चांकी गर्दीचा समावेश आहे. निर्माल्य तेलापासून देवस्थानला पावणेतीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.
शनिशिंगणापूर देवस्थानसाठी 2003 वर्ष विविध घडामोडींनी गाजले. शनेश्वर देवस्थान विश्वस्त व्यवस्था अधिनियम 2018 पूर्वीचा हा कायदा करूनही त्याची अंमलबजावणी न झाल्याने हिवाळी अधिवेशनात देवस्थानचा कारभार व भ्रष्टाचाराप्रचारासंदर्भात अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात आली. त्या अनुषंगाने आगामी नववर्षात शासन नियुक्त विश्वस्त मंडळ नेमण्यात येणार का हा मुद्दा उपस्थित होत आहे. सरत्या वर्षात शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार केंद्रबिंदू ठरला.
या सर्व घडामोडीत 50 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या देवस्थानचा महत्त्वाकांक्षी पानसतीर्थ प्रकल्प पूर्ण झाला आहे. नवीन दर्शन रांग सुरू करण्यात आली. शनि चौथरा बांधकामासाठी कर्नाटक राज्यातील दानशूर भक्ताने चाळीस लाख रुपये खर्च करून चौथऱ्याचे बांधकाम करत आहे, त्यासाठी कर्नाटकातील खाणीमध्ये काळा पाषाण ग्रॅनाईट दगडावर नक्षीकाम व कोरीवकाम सुरू आह. पुढील काही महिन्यात शनी चौथर्याचे काम पूर्ण होणार आहे.
सरत्या वर्षात शनिशिंगणापूरला निर्माल्य तेलापासून पावणेतीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. पुन्हा एकदा देवस्थान पेड दर्शन सुरू केले आहे. भाविकांना पेड दर्शनाची सक्ती करण्यात आली. पाचशे रुपये देणगी पावती फाडून थेट शनी चौथर्यावर प्रवेश देण्यात आला. शनी मंदिरात दरवर्षी होणाऱ्या नोकर भरतीने देवस्थानचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. अधिकारी व विश्वस्त यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने अनेक कामे रेंगाळले आहेत.
पानसतीर्थ प्रकल्प तब्बल तेरा वर्षांनी पूर्ण झाला, ही जमेची बाजू सोडली तर देवस्थानचा कारभार वादग्रस्त ठरला. शनिशिंगणापूर देवस्थानला अनेक भाविक दान देतात, सरत्या वर्षात ओडिशाचे मंत्री यांनी एक कोटी रुपयांचा कळस अर्पण केला. सरत्या वर्षात अमावस्या, शनि जयंती, अधिक मास, श्रावण महिना, नाताळ या सण उत्सवाबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे जवळपास 35 ते 40 लाख भाविक शनिशिंगणापूरला येऊन गेले.
देवस्थानला दान, विविध देणग्या, गाडी लिलाव यातून सहा ते सात कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. शनि भक्तांची होणारी लूट, कमिशन एजंटांचा सुळसुळाट यात सातत्याने वाढ होत आहे. या बाबीकडे देवस्थान प्रशासन व पोलीस प्रशासन सातत्याने डोळेझाक करत असल्याचे दिसून आले. गर्दीच्या काळामध्ये पार्किंगची व्यवस्था अपुरी पडत आहे. देवस्थानला लागून देवस्थानच्या मालकीची जमीन आहे ,तेथे शेती केली जाते. पार्किंगची सोय होत नाही, ही मोठी समस्या आहे.