पुणे – मेट्रो सेवेला पुणेकरांचा प्रतिसाद मिळत आहे. पण, मेट्रो स्थानक परिसरात पार्किंगची सुविधा कशी असेल? याबाबत मेट्रो प्रकल्पाच्या “डीपीआर’मध्ये नियोजनच करण्यात आले नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मेट्रो सेवेचा विस्तार होत असताना प्रवाशांना पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने मुख्य रस्त्यावर तसेच मेट्रो स्थानकाच्या आवारातच नागरिक जागा मिळेल तिथे वाहने पार्क करत आहेत. परिणामी, वाहतूक कोंडी होत आहेच.
शिवाय, प्रवाशांकडून पार्किंगला जागा न मिळल्यास मेट्रो प्रवास टाळला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पार्किंगच्या जागांबाबत चर्चा करण्यासाठी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी बैठक बोलाविली होती. यात मेट्रोला हव्या असलेल्या जागांची यादी महापालिकेस सादर करण्यात आली. तसेच पार्किंगचे नियोजन कसे असेल याचे सादरीकरण करण्यात आले. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह, पालिकेचे तसेच महामेट्रोचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
मनपा आयुक्तांनी विचारलेले प्रश्न
मेट्रोचा प्रकल्प आराखडा तयार करताना पार्किंगचा विचार का करण्यात आला नाही?
प्रत्येक स्थानकाचा वापर किती प्रवासी करतील? याचा अभ्यास केला, मग प्रवाशांची वाहने किती असतील?
प्रवाशांची वाहने पार्क करण्यासाठी कोणत्या जागा असतील? त्याचे नियोजन कसे असेल, हे आधी का ठरवले नाही?
मेट्रोने मांडलेली भूमिका…
“मेट्रोचा प्रकल्प आराखडा हा 2016 पूर्वीचा आहे. त्यात मेट्रो प्रशासनाने बदल केलेले नाहीत,’ एवढेच उत्तर यावेळी अधिकाऱ्यांना देता आले. मात्र, पार्किंगचे नियोजन का नाही, याबाबत मेट्रोचे सर्वच अधिकारी निरुत्तर झाले.
निर्णय होईपर्यंत प्रवाशांचा खोळंबा
महामेट्रोने महापालिकेस स्थानकांच्या परिसरात आवश्यक पार्किंगच्या जागांची माहिती दिली आहे. याबाबत, चर्चेसाठी मनपा प्रकल्प नियोजन, पथ तसेच संबधित विभागासह महामेट्रोच्या स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीत जागांबाबत चर्चा केली जाणार असून त्यानंतर या जागांची संयुक्त पाहणी करून निर्णय घेतला जाणार आहे. मात्र, तोपर्यंत मेट्रो प्रवाशांना पुरेशा पार्किंगच्या जागेअभावी अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.