पुणे -राज्यात नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांचे मूल्यांकन होण्यासाठी राज्य शासनाने परीस स्पर्श ही योजना सुरू करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला आहे. आता त्याची अंमलबजावणीसाठी समित्यांची रचना स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे नॅक मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांसाठी परीस स्पर्श योजनेची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धर्तीवर महाविद्यालयाचे नॅक मूल्यांकन होण्याच्या दृष्टीने परीस स्पर्श योजनेला आता खऱ्या अर्थाने व्यापक स्वरुप प्राप्त होणार आहे. त्याची अंमलबजावणी होण्यासाठी समितीची रचना स्पष्ट करण्यात आली. त्यानुसार संबंधित विद्यापीठांनी विद्यापीठ स्तरीय समिती आणि विद्यापीठाच्या अधिकारक्षेत्रनुसार जिल्हास्तरीय समित्यांची स्थापना करावी, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
नॅक मूल्यांकन प्रक्रियेतील अडचणी सोडवण्यासाठी “परीस स्पर्श’ योजना आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयांनी नॅक मानांकन आणि मूल्यांकनाच्या प्रक्रियेत गुणवत्ता राखणे, गुणवत्ता वाढ करणे अपेक्षित आहे. त्यासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी मदत व प्रोत्साहन देण्यात येत आहे. मात्र पासून वारंवार शासन स्तरावरून सूचना देऊनही शैक्षणिक संस्थांनी नॅक मूल्यांकनाकडे दुर्लक्ष केले आहे. अशा महाविद्यालयांना परीस स्पर्श योजनेच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी दूर केले जाणार आहे. त्यामुळे नॅक मूल्यांकन महाविद्यालयाचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत.