पुणे –शहरातील महापालिकाच्या ओपीडी, दवाखाने आणि मेडिकल स्टोअर्स लिंकअप करण्याचा विषय “तू कर, मी कर’ या वादात अडकला असून अद्यापही हे काम महापालिकेने किंवा स्मार्ट सिटीने हाती घेतलेले नाही.
महापालिकेच्या सगळ्या ओपीडी आणि रुग्णालयातील औषधालय एका सॉफ्टवेअरच्या सहाय्याने लिंकअप करण्याचा विषय रुबल अग्रवाल अतिरिक्त आयुक्त असताना मांडला होता. हा प्रस्ताव स्मार्ट सिटीकडून आणण्यात आला होता, त्यांना असे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी सांगितले होते. मात्र, त्यांनी अद्याप ते केलेले नाही.
महापालिकेने स्वत: हा विषय करण्याचा मध्यंतरी निर्णय घेतला आणि तशी निविदा काढण्याची हालचाल सुरू केली. मात्र, हा विषय स्मार्ट सिटी करणार असल्याचे समजल्यानंतर त्यांनी तो विषय थांबवला. मात्र, स्मार्ट सिटी आणि महापालिका या दोन्ही प्रशासनाकडून हा विषयच बासनात गुंडाळून ठेवण्यात आला आहे.
औषध विक्रेत्यांकडे ही सिस्टिम असते. यामध्ये एखाद्या औषधाचा दुकानात स्टॉक किती, तो किती विकला गेला, किती शिल्लक आहे याची माहिती व्हावी यासाठी त्या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो. तीच सिस्टिम महापालिकांच्या ओपीडींमध्ये असलेल्या औषधालयांसाठी करण्याचा हा विषय आहे. या माध्यमातून ओपीडींमध्ये कोणत्या प्रकारचे औषध जास्त लागते, रुग्ण कोणत्या दवाखन्यांमध्ये जास्त हे समजू शकते.