उरुळी कांचन – शिंदवणे घाटातून चाकण या ठिकाणी कोंबडी खाद्य घेऊन निघालेला ट्रक उलटून झालेल्या अपघातात चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 26) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
रामेश्वर लक्ष्मण शिंदे (वय 21, रा. शेलू, जि. परभणी) असे मृत्यू झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. पायल शेख (वय- 23, रा. मिरज, सांगली) ही जखमी झाली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक रामेश्वर शिंदे हे फलटण या ठिकाणावरून चाकण या ठिकाणी कोंबडी खाद्य घेऊन निघाले होते.
या ट्रकमध्ये त्याची मैत्रीण पायल त्याच्या सोबत होती. रविवारी संध्याकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिंदवणे घाट या ठिकाणी आले असता शिंदे यांना घाटात असलेल्या वळणाचा अंदाज आला नाही. व त्यांचा वाहनावरील ताबा सुटला व ट्रक उलटला. घटनेची माहिती मिळताच कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम, कस्तुरी प्रतिष्ठानची रुग्णवाहिका, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हवालदार रमेश गायकवाड, बाळासाहेब पांढरे, आदींनी जखमींना मदत केली.
वळणाचा टप्पा कमी करण्याची मागणी
शिंदवणे घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वारंवार होत असलेल्या अपघाताच्या ठिकाणावरील वळणाचा टप्पा कमी करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. या ठिकाणी जड वाहने वळताना वाहनचालकाला अंदाज येत नसल्याने हे अपघात होत आहेत. त्यामुळे सासवडकडून येणारा वळणाचा टप्पा वाहनचालकाच्या लक्षात येत नसल्याने हे अपघात होत आहेत. हा टप्पा काढण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.