नियोजन पुरते कोलमडले ः महापालिका आयुक्तांच्या आदेशालाच हरताळ
मुदतवाढ देऊनही मलनि:सारण विभाग अजूनही सुस्त
पुणे – शहरातील मलनि:सारण (ड्रेनेज) आणि पाणी पुरवठा विभागाची खोदाईची कामे 31 मेपर्यंत संपवून 7 जूनपर्यंत शहरातील सर्व रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. मात्र, समान पाणी योजना जून 2023 पर्यंत पूर्ण करायची असल्याने पाणीपुरवठा विभागाने खोदाई थांबविण्यास असमर्थता दर्शविली आहे.
तर, ड्रेनेज विभागाने काम अर्धवटच ठेवेलेले आहे. त्यामुळे महापालिकेच्या पथ विभागाकडून 4 जून संपली, तरी अद्यापही रस्त्यांची कामे सुरू केलेली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यंदा पुन्हा भर पावसाळ्यातच महापालिकेची रस्ते दुरुस्ती होणार असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी पालिकेच्या या तीनही विभागातील समन्वयाअभावी नगरसेवकांच्या गैरहजेरीत शहराची जबाबदारी असलेल्या आयुक्तांच्या आदेशालाच हरताळ फासला गेला आहे.
शहरात पावसाळापूर्व कामे करण्यासाठी महापालिकेने खासगी केबल कंपन्यांची खोदाई 30 एप्रिलपासून बंद केली होती. त्यानंतर पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागास 15 मेपर्यंत खोदाईस मुदतवाढ देण्यात आली. या कालावधीत त्यांनी खोदाई पूर्ण केल्यानंतर पथ विभागाने पुढील 15 दिवसांत म्हणजे 1 जूनपर्यंत रस्ते पूर्ववत करायचे होते. मात्र, दोन्ही विभागांनी आणखी 15 दिवसांची मुदत वाढवून मागितली. त्यानुसार त्यांच्या कामाची गरज लक्षात घेऊन या विभागास 31 मेपर्यंत कामे पूर्ण करण्याचे त्यानंतर पथ विभागाने 7 जूनपूर्वी शहरातील रस्ते पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते.
मात्र, ड्रेनेज विभागास मुदतवाढ दिल्यानंतर या विभागाकडून एक इंचही काम झालेले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे या विभागाचे काम शहरभर सर्वत्र अर्धवट असल्याने पथ विभागास रस्ते पूर्ववत करणे शक्य नाही, त्यामुळे 4 जून उजाडला तरी रस्त्यांच्या कामांना पूर्ण क्षमतेने सुरूवात झालेली नाही.