पुणे – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दि. 10 जून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 11 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या दोन्ही पालखी सोहळ्यातील मार्गावर हवामान कसे असेल याचा अंदाज देण्यासाठी पुणे वेधशाळा यंदाही पालखी मार्गावर “अपडेट’ असणार आहे. यासाठी वेधशाळेच्या वेबसाइटवर नवीन मथळ्याअंतर्गत प्रत्येक भागातील हवामानाचा अंदाज पाहता येणार आहे.
दोन्ही पालख्यांचे प्रस्थान एक महिना अधीच आल्याने आणि मान्सूनही अद्याप महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे, अशा स्थितीत वारकऱ्यांना हवामानाचा अंदाज समजावा (ऊन, पाऊस किंवा ढगाळ वातावरण) यासाठी पुणे वेधशाळेकडून आजच पुढील सहा दिवसांतील हवामानाचा अंदाज वर्तविला आहे.
यामध्ये दि. 10 ते 15 जूनदरम्यान, शहरातील कमाल तापमान 37 ते 39च्या आसपास राहील. आकाश निरभ्र राहणार असून संध्याकाळी ढगाळ वातावरण तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. यापार्श्वभूमीवर पालखी स्वागत करणाऱ्यांना सूचित करण्यात आले असून यापुढेही अशा सूचना दररोज दिल्या जाणार आहेत.
संकेतस्थळावर “पालखी 2023′
पुणे वेधशाळेने संकेतस्थळावर आषाढीवारीसाठी “पालखी 2023′ या शिर्षकाखाली हवामान अंदाज देण्यात येत आहे. यामध्ये पालखी मार्ग आणि तेथील हवामान अंदाज, सध्याचे पालखीचे ठिकाण आणि हवामान अंदाज, सद्यस्थितीतील हवामान माहिती यासह विविध माहिती मिळणार आहे. तसेच उष्णतेची लाट असो किंवा पावसाचा अंदाज याबाबतची माहितीही काही तास आधी मिळू शकते.