कोंढवा – उंड्री येथील न्याती इंटर्निटी सोसायटी चौकातील जीवघेणा खड्डा तसेच या रस्त्यांवरील छोट-मोठे खड्डे वारंवार मागणी करुनही महापालिकेकडून दुरुस्त केले जात नसल्याने अपघात होऊन अनेक दुचाकी चालक जखमी झाले होते. अखेर नागरिकांनी याबाबतची माहिती माजी सरपंच निवृत्ती अण्णा बांदल यांना देताच याची गांभीर्याने दखल घेतली.
बांदल यांनी तातडीने टेम्पोत सिमेंटची पोती, खडी क्रश यासह कारागीर, मजूर आणि खासगी बांधकाम अभियंता असे पथक घेत स्वत: खड्डे असलेल्या ठिकाणी पोहचले त्यांनी अगदी शास्त्रीय पद्धतीने अपघातास कारणीभूत ठरणारा खड्डा बुजवून रस्त्यावरील अन्य खड्डेही स्वखर्चातून कॉंक्रिटीकरण करून बुजविले.
पुणे महापालिकेला या समस्येबाबत गेली दीड महिन्यांपासून वारंवार फोन करून तसेच विनंती करूनही पालिकेने दखल घेतली नाही. त्यामुळे नारिकांनी पालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला तर स्वतः उभे राहून स्वखर्चातून खड्डे बुजविणारे बांदल यांचे आभार मानले. उंड्री भागातील प्रत्येक नागरिकांची समस्या ही माझी समस्या आहे. या भावनेसह पाणी, रस्ते, वीज, वाहतूक अशा समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असतो, असे माजी सरपंच बांदल यांनी सांगितले.