पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या सुरक्षिततेसाठी विद्यापीठाने बायोमेट्रिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. फक्त वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांनाच उद्यापासून (दि.14) बायोमेट्रिक यंत्रणेद्वारे प्रवेश दिला जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले. त्यामुळे “पॅरेसाइट’ म्हणजे अवैधरित्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा लाभ मिळणार नसल्याचे पुन्हा एकदा विद्यापीठाने सूचित केले आहे.
विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर वसतिगृहात प्रवेश न मिळालेले, प्रवेशच न घेतलेले अथवा अभ्यासक्रम पूर्ण होऊनही काही विद्यार्थी वसतिगृहात राहत असल्याचे दिसून आले. वसतिगृहात राहणाऱ्या “पॅरेसाइट’ विद्यार्थ्यांवर विद्यापीठाने कारवाई करण्यास सुरवात केली. त्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवारी रात्री मध्यरात्रीच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केले. या सर्व पार्श्वभूमीवर विद्यापीठाने स्पष्टीकरण देत वसतिगृहात प्रवेशित नसणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांची सोय त्यांच्या स्तरावर इतरत्र करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरात मुलांची 9 तर मुलींची 10 अशी एकूण 19 वसतिगृह कार्यान्वित आहेत. विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित सुमारे पाच हजार विद्यार्थ्यांची वसतिगृहाची मागणी आहे. विद्यापीठ परिसरात गुणवत्ता व सामाजिक आरक्षण याचा विचार करून तीन हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवासाची सोय करण्यात आली आहे. त्यानंतरही विद्यार्थ्यांची वसतिगृहाची वाढती मागणी लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृह खोल्यांमध्ये जेथे जेथे शक्य आहे याठिकाणी अधिकच्या कॉट टाकून वसतिगृहांची क्षमता वाढवून विद्यार्थ्यांना सामावून घेतले आहे. मात्र, असे करताना प्रत्यक्ष राहत असलेल्या विद्यार्थ्यांना राहण्यायोग्य सुविधा देण्यासाठी व्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही, याकडे लक्ष देण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनचे म्हणणे आहे.
नियमबाह्य आंदोलनात सहभागी होऊ नका
ऐन मध्यरात्री केलेल्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांनी कोणत्याही नियमबाह्य आंदोलनात सहभागी होऊ नये, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रश्नावर विद्यापीठ प्रशासन अत्यंत संवेदनशील असून भविष्यात रिक्त होणाऱ्या जागांवर अथवा नव्याने निर्माण होणाऱ्या जागांवर टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाईल, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.