पुणे -शहरात निर्माण होणाऱ्या ओल्या आणि मिश्र कचऱ्यावर प्रक्रीया करून महापालिकेकडून तयार केलेल्या जात असलेल्या खताला राज्यशासनाने “हरित – महा सिटी कंपोस्ट’ ब्रॅंड बहाल केला आहे. महापालिकेच्या प्रकल्पात तयार झालेल्या खताची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर एफसीओ मानांकनानुसार असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे.
राज्यात अशा प्रकारे कचऱ्यातून शेतीसाठी खत तयार करून त्याला शासनाचे मानांकन मिळविणारी पुणे ही दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिकांमधील पहिली महापालिका ठरली आहे. त्यामुळे हा प्रकल्प अनोखा ठरत आहे.
हडपसर येथील कचरा रॅम्पच्या ठिकाणी 150 टन तसेच उरुळी देवाची कचरा डेपोत 350 टन क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प उभारलेले आहे. येथे तयार होणाऱ्या खताचे नमुने शासनाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी सांगितले.
राज्यभरात विक्री करता येणार
राज्यशासनाकडून स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत हरित महासिटी कंपोस्ट स्वच्छ महाराष्ट्र मानांकन दिले जाते. त्यात ज्या नगरपालिका तसेच महापालिका कचऱ्यापासून शेतीसाठी खत तयार केली जाते, त्याची तपासणी करून ते मानांकनानुसार असल्यास त्याची विक्री राज्यात करण्यासाठी महापालिकेस ब्रॅंड दिला जातो. हा ब्रॅंड “हरित-महा सिटी कंपोस्ट’ या नावाने ओळखलो जातो. पुणे पालिकेतर्फे तयार होणाऱ्या खताची शासन नियमानुसार राज्यभरात विक्री करता येईल. तसेच, उद्याने, वनराई, वनोद्यानांच्या प्रकल्पासाठीही वापरू शकते.