पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांचा विस्तार आणि लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे फळे भाजीपाल्यांची गरज वाढत आहे. त्यामुळे पुण्यात येणाऱ्या सर्व महामार्गांवर उपबाजार उभारणीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी दिली.
शहरामध्ये येणाऱ्या सर्व महामार्गालगत उपबाजार उभारण्याचे बाजार धोरण आहे. वाहतूक कोंडीमुळे शहरात मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरालगत उपबाजार उभारल्यास शहरात येणारी मोठी वाहने तेथील बाजारातच थांबतील, असे काळभोर म्हणाले.
तर सचिव धोंडकर म्हणाले की, संचालक मंडळ नियुक्ती झाल्यानंतर सेस चुकवेगिरी आणि चोरी थांबविण्याबरोबरच बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठीचे पहिले उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. पूर्वी एकूण सेस संकलनाच्या केवळ १० टक्के वाढीचे उद्दीष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात यायचे. मात्र आम्ही डिसेंबरनंतर उद्दीष्ट ४० टक्के वाढीचे ठेवले आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. मार्चअखेर अंतिम सेस वसुलीची आकडेवारी समोर येईल. तसेच मांजरी उपबाजारातील कार्यपद्धतीमध्ये बदल केल्याने सेस संकलनात वाढ झाली आहे.
– सोलापूर रस्ता कोरेगाव मुळ ११ एकर जागेत प्रायोगिक तत्वावर बाजार सुरू करणार
– सातारा रस्ता खेड शिवापूरात ५ एकर जागेत तातडीने उपबाजार उभारणार
– उत्तमनगर येथील ४ एकर जागेत उपबाजार सुरू
– नगर रस्त्यावरील पेरणे येथे १० एकर जागेसाठी शासन स्तरावर पाठपुरावा, आराखडा तयार
“मोशी येथील उपबाजारातील नऊ एकर जागेवर २७० कोटी रूपयांचा विकास आराखडा शासनाला सादर केला आहे. परवानगी मिळाल्यानंतर तातडीने काम सुरू होणार आहे. मोशी येथे शेतकऱ्यांना रास्त दरात खते, बियाणे, अवजारे आणि ट्रॅक्टरसारख्या वाहनांच्या खरेदीसाठी बरोबरच शितगृह, निर्यातीसाठीची प्रतवारी केंद्रे आणि भव्य मॉल उभारणार आहे.” – दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे
“पुणे रिंगरोडलगत ३०० एकर पेक्षा जास्त जागा समितीसाठी घेण्याचा प्रयत्न आहे. यामाध्यमातून रिंगरोडलगत शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मुख्य बाजार देखील उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी बाजार समिती जागेची पाहणी करत आहे. जागा उपलब्ध झाल्यास शासनाला प्रस्ताव दिला जाईल.” – डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे