पुणे – स्ट्रॉबेरी पीक म्हटले, की त्याची लागवड फक्त महाबळेश्वर परिसरात होते असा समज आहे; परंतु पुण्याच्या वातावरणात सुद्धा स्ट्रॉबेरी पिकाची लागवड शक्य आहे, हे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पुण्यातील कृषी महाविद्यालयात 20 गुंठे जागेवर स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड करून त्यामधून चांगले उत्पादन मिळाले आहे.
कृषी पदवीधरांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोनाचा अवलंब करण्यासाठी कृषी आधारित अनुभवातून शिक्षण प्रणाली राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृषी पदवी आणि उद्यानविद्या पदवी विद्यार्थ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाची यशस्वी लागवड करून चांगले उत्पादन काढले आहे. स्ट्रॉबेरी हे पीक संवेदनशील असून, योग्य व्यवस्थापन आणि काळजी घेतली, तर निश्चितच उत्पादन शक्य आहे. फक्त त्यासाठी लागवडीचा योग्य कालावधी महत्त्वाचा आहे, असे निदर्शनास आले आहे.
२० गुंठे क्षेत्रावर दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी स्ट्रॉबेरीच्या स्वीट सेन्सेशन, ब्रिलियन्स, एलिना, विंटर डॉन आणि ब्युटी अशा पाच जातींची लागवड करण्यात आली होती. लागवडीपासून ते काढणी आणि विक्री व्यवस्थापनापर्यंतची सर्व कामे विद्यार्थ्यांनी केली आहेत. सर्वसाधारणपणे ७५ ते ८० दिवसांनी स्ट्रॉबेरीची काढणी सुरू होते आणि दीड ते दोन महिन्यांपर्यंत काढणी सुरू राहते.
जानेवारी महिन्यापासून या स्ट्रॉबेरीची काढणी सुरू झाली आहे. प्रत्येक झाडाला सरासरी ३५० ते ४५० ग्रॅम एवढे उत्पन्न मिळत असून, जवळपास ११ ते १७ फळे लागली आहेत. फळांचे सरासरी वजन २५ ते ३० ग्रॅम इतके आहे. स्वीट सेन्सेशन या जातीच्या फळाचे ८१ ग्रॅम इतके सर्वात जास्त वजन दिसून आले आहे. येथे दररोज जवळपास ४० ते ५० किलो स्ट्रॉबेरीचे उत्पादन निघत आहे. त्यातून महाविद्यालयास १२ ते १५ हजार रुपयांचे दररोज उत्पन्न मिळत असल्याचे कृषी महाविद्यालयाकडून सांगण्यात आले.
कृषी महाविद्यालय पुणे येथे घेण्यात आलेला हा पहिलाच प्रयोग असून, कृषी महाविद्यालय पुण्याचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्यानविद्या विभागातील प्राध्यापक डॉ. सुभाष भालेकर यांच्या देखरेखीखाली स्ट्रॉबेरीची यशस्वी लागवड आणि उत्पादन घेण्यात आले आहे.
- झाडाला सरासरी ३५० ते ४५० ग्रॅम
- सरासरी ११ ते १७ फळे
- जास्तीत जास्त ८१ ग्रॅम वजनाचे फळ
- दररोज १२ ते १५ हजारांचे उत्पादन